David Warner Retirement From Test and ODI Cricket : ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, लोकांनी मला एक मनोरंजक क्रिकेटर म्हणून लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. डेव्हिड वॉर्नरच्या म्हणण्यानुसार, त्याला पूर्ण आशा आहे की तरुण मुलं त्याच्या करिअरमधून शिकतील आणि त्याच्या मार्गावर चालतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वीच सांगितले होते की, सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर तो कसोटी फॉरमॅटला अलविदा करणार आहे. मात्र, मालिकेच्या मध्यावर त्याने कसोटी तसेच वनडेतून निवृत्ती जाहीर केली. डावखुऱ्या फलंदाजाने कसोटीच्या शेवटच्या डावात शानदार अर्धशतक झळकावले आणि आपल्या कारकिर्दीचा समारोप उत्तम पद्धतीने केला.

कसोटी क्रिकेट खूप मनोरंजक – डेव्हिड वॉर्नर

तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या संवादादरम्यान डेव्हिड वॉर्नरने आपल्या कारकिर्दीत त्याला कसे लक्षात ठेवायला आवडेल हे सांगितले. अनुभवी फलंदाज म्हणाला, “लोकांनी मला एक रोमांचक आणि मनोरंजक क्रिकेटर म्हणून लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. आशा आहे की मी ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आले. याशिवाय लहान मुलेही मी दाखवलेल्या मार्गावर चालतील अशी आशा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासू कसोटीन क्रिकेटपर्यंतचा प्रवास खूप चांगला होता. कसोटी सामने खेळण्यासाठी मेहनत करत राहा, कारण त्यात खूप मजा येते.”

हेही वाचा – AUS vs PAK : शेवटच्या कसोटीनंतर डेव्हिड वॉर्नरने जिंकली मनं, एका लहान मुलाला दिले खास ‘गिफ्ट’, पाहा VIDEO

याशिवाय वॉर्नरने असेही सांगितले की, कुटुंब त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, “कुटुंब तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. तुम्ही जे करता ते त्यांच्या पाठिंब्याशिवाय करू शकत नाही. सुंदर आणि अद्भूत संगोपनाचे श्रेय मी माझ्या पालकांना देतो. मी माझा भाऊ स्टीव्हच्या पावलावर पाऊल टाकले. त्यानंतर माझी पत्नी कँडिस माझ्या आयुष्यात आली. आमचे एक सुंदर कुटुंब आहे आणि मी त्यांच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. याविषयी पुढे बोललो तर मी खूप भावूक होईन.”

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ८ विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ १३० धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी खेळाच्या चौथ्या दिवशी दोन गडी गमावून सहज गाठले. अशा प्रकारे डेव्हिड वॉर्नरने त्याच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून कसोटी क्रिकेटला अलविदा केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner says people should remember me as an exciting and entertaining cricketer after retirement vbm