सिडनी : कसोटी सामन्याच्या अखेरच्या डावात अर्धशतक आणि विजय अशा थाटात क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने भविष्यात प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विविध व्यावसायिक लीगसाठी तो उपलब्ध असणार आहे. निवृत्तीनंतर वॉर्नरने भविष्यात प्रशिक्षक बनण्याची इच्छा बोलून दाखवली. अर्थात, त्यापूर्वी मला पत्नीची परवानगी घ्यावी लागेल. इतकी वर्षे कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा ती मला बाहेर राहून देईल की नाही हे माहीत नाही, अशी मिश्कील टिप्पणीही वॉर्नरने या वेळी केली.
संपूर्ण कारकीर्दीत वॉर्नर मैदानावर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मैदानावरील स्लेजिंग (खेळाडूंना शाब्दिक डिवचणे) प्रकरणात अनेकदा त्याचे नाव आले होते. मात्र, वॉर्नरला भविष्यात हे प्रकार दुर्मीळ होतील असे सांगितले. ‘‘स्लेजिंग आता फार काळ टिकणार नाही. व्यावयासिक लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू एकत्रित खेळत असल्यामुळे प्रत्येकाला प्रतिस्पर्धी खेळाडूची चांगली जाण होईल आणि त्यामुळे ‘स्लेजिंग’ हा विषय लवकरच कायमचा संपुष्टात येईल असे भाकीत वॉर्नरने या वेळी व्यक्त केले.
हेही वाचा >>>IND vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित-विराटसह ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
‘‘क्रिकेटमध्ये झपाटय़ाने बदल होत आहेत. खेळाडूंना मैदानावर अशा गोष्टी करायलाच वेळ मिळणार नाही. खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदललेला असेल. क्रिकेटच्या वैशिष्टय़ांबद्दल आणि सामना कसा जिंकायचा याकडे खेळाडू अधिक लक्ष केंद्रित करतील,’’ असेही वॉर्नर म्हणाला.