David Warner Stolen Baggy Green Cap: ऑस्ट्रेलियाला ३ जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. या सामन्यापूर्वी वॉर्नरचे सामान चोरीला गेले होते. त्याने स्वतः व्हिडीओ पोस्ट करताना ही माहिती दिली आहे. वॉर्नरने सांगितले की त्याची बॅकपॅक चोरीला गेली होती, ज्यामध्ये त्याची ‘बॅगी ग्रीन कॅप’ देखील होती. जो कोणी ते परत करेल त्याला भेटवस्तू देऊ असे वॉर्नरने म्हटले आहे.
व्हिडीओ पोस्ट करून आवाहन करा
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने सांगितले की त्याच्या अंतिम कसोटीपूर्वी मेलबर्न ते सिडनी प्रवास करताना, त्याच्या बॅगी ग्रीन कॅपसह काही मौल्यवान वस्तू हरवल्या आहेत. वॉर्नर म्हणाला की, “माझी टीम हॉटेल आणि एअरलाइन क्वांटासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून ते शोधण्यास सक्षम आहेत. मात्र, तुमचा लाडका खेळाडू या नात्याने मी वॉर्नर माझी बॅगी ग्रीन कॅप शोधण्यात मदत करण्याचे आवाहन तुम्हा चाहत्यांना करत आहे. ते परत करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अडचण येणार नाही,” असेही तो म्हणाल. परत बॅकपॅक करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याचे आश्वासनही त्याने दिले आहे. त्याने हॉटेलचा कॅमेरा पाहिला पण कोणीही बॅग उघडताना किंवा बॅग घेऊन जाताना दिसले नाही. मात्र, कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये काही ब्लाइंड स्पॉट्स होते.
पाकिस्तानविरुद्ध शेवटची कसोटी खेळणार आहे
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ जानेवारीपासून होणारा सामना सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत, त्याचे सहकारी खेळाडू त्याला त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच सिडनी क्रिकेट मैदानावर विजयासह निरोप देऊ इच्छितात. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉर्नरने १६४ धावांची शानदार खेळी केली.
तसेच वन डे निवृत्तीची घोषणा केली
नवीन वर्षाच्या दिवशी डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. तो ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये खेळला होता. या ३७ वर्षीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वविजेतेपद मिळवून दिले आहे. वॉर्नर २०१५ आणि २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात विजेत्या संघाचा भाग होता. गेल्या वर्षी २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या फॉरमॅटमध्ये २२ शतकांसह ४५.३०च्या सरासरीने ६,९३२ धावा केल्या आहेत.
वॉर्नरला जास्तीत जास्त लीग क्रिकेट खेळायचे आहे
वॉर्नर क्रिकेट लीग बद्दल म्हणाला की, “त्याला जगभरातील इतर लीगमध्ये खेळायचे आहे. त्याच्या निवृत्तीमुळे वन डे संघाला पुढे जाण्यास मदत होईल.” ऑस्ट्रेलियन सलामीवीर पुढे म्हणाला की, “जर तो दोन वर्षे चांगला खेळत राहिला आणि संघाला त्याची गरज असेल तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.”