एकेरीतील पराभवांमुळे ०-२ने भारत पिछाडीवर पडलेला.. मग ‘करो या मरो’ सामन्यातही दोन सेटने मागे.. पण युवा खेळाडूंना लाजवेल असा चपळ आणि उत्साहवर्धक खेळ करत लिएण्डर पेसने रोहन बोपण्णाच्या साथीने थरारक लढतीत दुहेरीचा सामना जिंकला आणि सर्बियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान कायम राखले. या विजयामुळे भारताने १-२  असे आव्हान जिवंत राखले असले तरी स्पर्धेत बाजी मारण्यासाठी रविवारी होणाऱ्या परतीच्या दोन्ही एकेरीच्या लढतीत भारताला विजय आवश्यक आहे.
पेस व बोपण्णा यांनी पहिले दोन सेट गमावल्यानंतर चिवट व जिद्दीने खेळ केला. त्यांनी इलिजा बोझोलॅक व नेनाद झिमोन्झिक यांच्यावर १-६, ६-७ (४-७), ६-३, ६-३, ८-६ असा रोमहर्षक विजय मिळविला. एकेरीचे पहिले दोन्ही सामने जिंकून सर्बियाने शुक्रवारी २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे दुहेरीतील लढतीविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. सर्बियाच्या जोडीने पहिला सेट केवळ १८ मिनिटांत जिंकताना दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवला. ४१ वर्षीय पेसला बोपण्णाची सुरेख साथ लाभली. त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये एक सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित ४-२ अशी आघाडी घेतली, मात्र सव्‍‌र्हिसब्रेक करण्याची संधी त्यांना साधता आली नाही. सर्बियाच्या जोडीने निर्धाराने खेळ करत २-४ अशा पिछाडीवरून ६-६ अशी बरोबरी साधली. टायब्रेकरमध्येही बोपण्णाला सव्‍‌र्हिसवर गुण मिळवता न आल्याने सर्बियाच्या जोडीने  ७-४ अशा गुणांसह हा सेट घेतला.
तिसऱ्या सेटमध्ये बोझोलॅक-झिमोन्झिक यांच्याकडे २-० अशी आघाडी असताना सर्बियाचा संघ या सामन्यासह ही लढतही जिंकणार, असे चित्र दिसू लागले होते. पण जिगरबाज पेस-बोपण्णा जोडीने कोणतेही दडपण न घेता जिद्दीने खेळ करत सामन्याचा रंगच पालटवला. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी परतीच्या खणखणीत फटक्यांचा सुरेख खेळ करत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. चांगला समन्वय साधत त्यांनी हा सेट ६-३ असा घेतला. चौथ्या सेटमध्ये सुरुवातीलाच प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदत पेस-बोपण्णा जोडीने ४-२ अशी भक्कम आघाडी घेतली. हा सेट केवळ २९ मिनिटांत ६-३ असा घेत त्यांनी सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.
पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही जोडय़ांनी तोडीस तोड खेळ केला. पण अखेर भारतीय जोडीने प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदून ८-६ अशी बाजी मारत भारताचे आव्हान कायम राखले. सामना संपल्यानंतर दोघांनीही तिरंगा उंचावत आनंद साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा