लिएंडर पेस हा प्रौढत्वाकडे झुकला असला तरी अजूनही तो दुहेरीत भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे याचा प्रत्यय येथे आला. त्याने सनमसिंग या युवा खेळाडूच्या साथीत एलबर्ट सेई व डेव्हिड सुसांतो यांच्यावर ६-२, ६-१, ६-४ अशी मात करीत इंडोनेशियाविरुद्धच्या डेव्हिस टेनिस लढतीत भारतास ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
भारताने शुक्रवारी एकेरीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे दुहेरीचा सामना जिंकून लढतीत विजयी आघाडी भारत घेणार हीच अपेक्षा होती.
पेस व सनम यांनी अतिशय अव्वल दर्जाचा खेळ केला. पहिल्या सेटमध्ये दोन वेळा त्यांनी सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. पुन्हा दुसऱ्या सेटमध्ये त्याचाच कित्ता गिरविताना त्यांनी परतीच्या खणखणीत फटक्यांचा सुरेख खेळ केला.
 पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये ते थोडेसे आरामात खेळले. तथापि या सेटमध्येही त्यांनी एक सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हाच ब्रेक त्यांना सेट जिंकण्यासाठी उपयुक्त ठरला.
भारताचा विजय निश्चित झाल्यामुळे परतीच्या लढतींबाबत फारसे औत्सुक्य राहिले नाही.
रविवारी होणाऱ्या परतीच्या पहिल्या एकेरीत सोमदेव देववर्मन याची ख्रिस्तोफर रुंग्केट याच्याशी गाठ पडणार आहे. त्यानंतर युकी भांब्री व विष्णु नुग्रोहो यांच्यात सामना होईल.