David Malan Retirement From International Cricket: इंग्लंड क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाजाने क्रिकेटला अलविदा केलं आहे. इंग्लंडसाठी सर्व फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा माजी फलंदाज डेव्हिड मलान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली आहे. ३६ वर्षीय मलानने ‘द टाइम्स ऑफ लंडन’ या ब्रिटीश वृत्तपत्राला सांगितले की, पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये मिळालेल्या यशामुळे तो आनंदी आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
मलानने २२ कसोटी, ३० एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. २०२० मध्ये तो टी-२० फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल फलंदाज ठरला. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो या फॉरमॅटमध्ये खेळलेला नाही. मलान म्हणाला, ‘मी तिन्ही फॉरमॅट खूप गांभीर्याने घेतले पण कसोटी क्रिकेटसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पाच दिवसांचे अंतर आणि तयारीचे दिवस. हे मानसिकदृष्ट्या खूप थकवणारे आहे.
हेही वाचा – KL Rahul: “मी कोणत्याही…” केएल राहुलला LSG संघ रिलीज करणार? संघमालक संजीव गोयंकांचे मोठे वक्तव्य
डेव्हिड मलानने २०१७ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २२ कसोटींमध्ये १०७४ धावा, ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये १४५० धावा आणि ६२ टी-२० सामन्यांमध्ये १८९२ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ८ शतके आणि ३२ अर्धशतके केली आहेत. त्याने आयपीएलमध्ये १ सामनाही खेळला आहे, ज्यामध्ये त्याने २६ धावा केल्या आहेत. मलान आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला आहे. याशिवाय तो कधीकधी गोलंदाजी करतानाही दिसला. मलानने कसोटीत २ तर एकदिवसीय आणि टी-२० मध्ये १-१ विकेट घेतली आहे.
डेव्हिड मलानने टाईम्स ऑफ लंडनला मुलाखत देताना सांगितले की, ‘मी मोठा होत असताना कसोटी क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच शिखरावर राहिले आहे. काही वेळा मी चांगला खेळलो पण काही वेळा मला सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही, जे निराशाजनक होते कारण मला वाटले की मी यापेक्षा चांगला खेळाडू आहे. मग मी व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत सर्व अपेक्षा ओलांडल्या.
“मी तिन्ही फॉरमॅट अत्यंत गांभीर्याने खेळलो, पण कसोटी क्रिकेटची तीव्रता काही वेगळीच होती: पाच दिवस आणि सराव करण्याचे वेगळे दिवस. मला चेंडूंवर मोठे फटके खेळायला आवडतात आणि मी सराव करताना खूप मेहनतही घेतली. ते दिवस खूप मोठे होते. मला खूप मानसिक त्रास होत होता, विशेषत: मी खेळलेली लांबलचक कसोटी मालिका, जिथे तिसऱ्या किंवा चौथ्या कसोटीनंतर माझी कामगिरी घसरली.”