दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्यांचे पर्व पुढील वर्षीपासून प्रत्यक्षात अवतरणार आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात पुढील वर्षी दिवस-रात्र स्वरूपाचा क्रिकेट कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे. या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूंचा वापरला जाणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले की, ‘‘न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाइट यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडचा संघ आमच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात होबार्ट येथे दिवस-रात्र स्वरूपाचा कसोटी सामना आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१२मध्येच मान्यता दिली आहे. गुलाबी चेंडूंचा उपयोग आम्ही शेफील्ड चषक स्पर्धेत केला होता. दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्यांमुळे कसोटी सामन्यांची लोकप्रियता वाढण्यास मदत होणार आहे.’’
सदरलँड्स पुढे म्हणाले, ‘‘जगातील कानाकोपऱ्यात असे कसोटी सामने लोकप्रिय होतील. कारण काही देशांमध्ये कडक उन्हात दिवसा क्रिकेट खेळणे खूपच कठीण असते. उन्हाचा अनिष्ट परिणाम खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीवर होऊ शकतो. हे लक्षात घेता दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटीला खेळाडूही मान्यता देतील अशी मला खात्री आहे. ’’