WPL 2025 MI vs DC Highlights in Marathi: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ महत्त्वपूर्ण वळणावर आहे. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाने चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मुंबई इंडियन्सवर ५ षटकं आणि ३ चेंडू राखून शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मुंबई इंडियन्सकडून गुणतालिकेतील पहिलं स्थान हिसकावून घेतलं आहे.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १२३ धावा केल्या. मुंबईचा संघ आजच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अपयशी ठरला. सुरूवातीला संघातील फलंदाज फेल ठरले, तर नंतर गोलंदाजांना सामना संपेपर्यंत फक्त १ विकेट घेण्यात यश मिळाले.

दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघातील गोलंदाजांनी हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सिद्ध केले. मुंबईकजून यस्तिका भाटिया आणि मॅथ्यूजने चांगली सुरूवात केली होती. पण ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे मुंबईचा संघ मोठी धावसंख्या गाठू शकला नाही. यस्तिका भाटिया ११ धावा तर हिली मॅथ्यूज २२ धावा करत बाद झाली.

तुफानी फॉर्मात असलेली नॅट स्किव्हर ब्रंट १८ धावा करत स्वस्तात परतली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरदेखील २२ धावा करत बाद झाली. यानंतर अमनजोत कौर आणि अमेलिया केरने प्रत्येकी १७ धावा करत संघाला १०० धावांचा टप्पा गाठून दिला आणि मुंबईने १२३ धावा केल्या. दिल्लीकडून जेस जोनासनने आणि मिन्नू मनी आणि ३-३ विकेट्स घेत मुंबईचे कंबरडे मोडले. यांतर शिखा पांडे आणि एनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरात दिल्लीने वादळी सुरूवात केली. मुंबईने दिलेल्या १२४ धावांचे लक्ष्य दिल्लीने १ विकेट गमावत १४.३ षटकांत पूर्ण केले. मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करत एक चांगली सुरूवात करून दिली. शफाली वर्मा २८ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने ४९ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ६० धावा केल्या. तर जेमिमा रोड्रिग्जने १५ धावांची खेळी करत कर्णधाराला चांगली साथ दिली.

Story img Loader