Shreyanka Patil New Records in WPL 2024 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघाने महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. आरसीबीने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने इतिहास रचला. फ्रँचायझीच्या १६ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच ट्रॉफी आहे. पुरुष संघाला आतापर्यंत एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्याचबरोबर संघाची फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलने ही शानदार गोलंदाजी करत इतिहास रचला आहे.
श्रेयंका पाटीलने रचला इतिहास –
या सामन्यात २१ वर्षीय श्रेयंका पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. आरसीबीसाठी ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने ३.३ षटकात १२ धावा देत चार विकेट्स घेतल्या. यासह श्रेयंका पाटील महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम स्पेल टाकणारी गोलंदाज ठरली. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या हेली मॅथ्यूजच्या नावावर होता. हेली मॅथ्यूजने २०२३ महिला प्रीमियर लीगमध्ये ४ षटकात ५ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या.
तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तिच्या संघाने १८.३ षटकांत ११३ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकांत २ गडी गमावून ११५ धावा करून सामना आणि स्पर्धा जिंकली. त्यांच्या विजयात आरसीबीच्या गोलंदाजांचे महत्त्वाचे योगदान राहिले. सोफी मोलिनक्स आणि श्रेयंका पाटील यांच्यासह आशा शोभनाने दिल्लीच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. गोलंदाजांनंतर स्मृती मंधाना, सोफी डिव्हाईन आणि एलिस पेरी यांनी शानदार फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेले.
स्मृती मंधाना आणि सोफी डिव्हाईनने रचला विजयाचा पाया –
स्मृती मंधाना आणि सोफी डिव्हाईन यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. डिव्हाईन २७ चेंडूत ३२ धावा केल्या. तिने ५ चौकार आणि १ षटकार मारला. तिला शिखा पांडेने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर मंधानाने एलिस पेरीसह डावाची धुरा सांभाळली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ३३ धावांची भागीदारी केली. मंधाना ३९ चेंडूत ३१ धावा करून बाद झाली. त्याने ३ चौकार मारले. अरुंधती रेड्डीने तिला झेलबाद केले. येथून एलिस पेरीसह रिचा घोषने विजय मिळवून. पेरी ३५ आणि रिचा१७ धावा करून नाबाद परतली.