मनोरंजन कराचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी
महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या राष्ट्रपितांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. कसोटी मालिकेतील चौथी आणि अंतिम कसोटी राजधानी दिल्लीत होत आहे. मात्र अंतर्गत बंडाळ्यांमुळे कसोटीचे आयोजन धोक्यात आले आहे. सारवासारवीचा प्रयत्न म्हणून दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेने आर्थिक ताळेबंद सादर केला असून, आयोजनासाठी ठोठावण्यात आलेल्या मनोरंजन कराचे पुनर्मूल्यांकन व्हावे यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना साकडे घातले आहे.
दिल्ली सरकारने दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेवर २४ कोटींचा मनोरंजन कर ठोठावला आहे. ‘दिल्ली सरकारने २००८ ते २०१२ या कालावधीसाठी कर लागू केला आहे, ज्या काळात संघटनेला करातून सूट देण्यात आली होती’, असा दावा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी केला आहे. १७ नोव्हेंबपर्यंत आयोजनासाठीच्या आवश्यक तरतुदी पूर्ण न केल्यास दिल्लीऐवजी पुण्याला आयोजनाचा मान मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत कसोटी आयोजनासाठी तयार स्टेडियम्सच्या सूचीत पुण्याचा समावेश करण्यात आला होता.
‘करातून सूट मिळावी यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बातचीत करण्याचा सल्ला दिला आहे,’ अशी माहिती चौहान यांनी दिली.
दरम्यान या आठवडय़ाच्या अखेरीस २०१४-१५ वर्षांसाठीचा ताळेबंद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सादर करण्यात येईल, असेही चौहान यांनी पुढे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा