वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ांवर भारतीय फलंदाजीच्या मर्यादा पुन्हा एकदा उघडय़ा पडल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने १३४ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करला. दक्षिण आफ्रिकेने आता तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. क्विंटन डी कॉकचा (१०६) ‘शॉक’ आणि हशिम अमलाच्या (१००) ‘हमला’मुळे दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर लोनवाबो त्सोत्सोबेने विजयाचा कळस चढवला आणि भारताच्या फलंदाजीच्या फळीने ३५.१ षटकांत १४६ धावांत हाराकिरी पत्करली.
भारतीय उपखंडात आपला विजयी अश्वमेध आवेशाने दौडत राखणाऱ्या भारताच्या फलंदाजीला दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला सामोरे जाणे कठीण गेले. सुरेश रैना या एकमेव फलंदाजाने झुंजार फलंदाजी करीत ३६ धावा केल्या, त्याव्यतिरिक्त बाकी फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.
मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या दडपणाखाली भारताची आघाडीची फळी डेल स्टेन आणि त्सोत्सोबेच्या गोलंदाजीपुढे कोसळली. या दोघांनी मिळून सात भारतीय फलंदाजांना तंबूची वाट दाखवली.
 त्याआधी, क्विंटन डी कॉकचा शतकी झंझावात सलग दुसऱ्या सामन्यातही दिसून आला. कॉक आणि हशिम अमला यांच्या शतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अमलाने रविवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा ८१व्या सामन्यांत ओलांडताना सर विवियन रिचर्ड्स (८८ सामने) यांचा विक्रम मोडीत काढला.
डी कॉक आणि अमला यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील आपली खेळी पुढे चालू ठेवत असल्याच्या आविर्भावात आपला खेळ केला. त्यांनी १९४ धावांची दमदार सलामी नोंदवली, तेव्हा दक्षिण आफ्रिका पुन्हा तीनशे धावसंख्येचा टप्पा ओलांडणार अशी चिन्हे दिसत होती. परंतु अखेरच्या १५ षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची फळी कोलमडली. जे पी डय़ुमिनीने २९ चेंडूंत २ चौकारांसह २६ धावा केल्या. परंतु ४९व्या ( शेवटच्या) षटकात व्हर्नन फिलँडर आणि रयान मॅकलारेन यांनी २० धावा काढल्या.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट होते, परंतु प्रत्यक्षात वरुणराजाने कृपादृष्टी राखली. मात्र ओलसर मैदानामुळे सामना ९० मिनिटे उशिराने सुरू झाला. त्यामुळे ही लढत ४९ षटकांची करण्यात आली. जोहान्सबर्गमधील पराभवानंतरही भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकल्यावर पुन्हा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचे धारिष्टय़ दाखवले.
पहिल्या सामन्यातील प्रतिकूल निकालामुळे भारताने या सामन्यात तीन बदल केले. पाठदुखीमुळे युवराज सिंग खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळाले. याचप्रमाणे पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा यांना वगळून उमेश यादव आणि इशांत शर्मा या अनुभवी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने वेन पार्नेलच्या जागी फिलँडरला संधी दिली.
 संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ४९ षटकांत ६ बाद २८० (क्विंटन डी कॉक १०६, हशिम अमला १००; मोहम्मद शमी ३/४८) विजयी वि. भारत : ३५.१ षटकांत सर्व बाद १४६ (सुरेश रैना ३६; लोनवाबो त्सोत्सोबे ४/२५, डेल स्टेन ३/१७)
सामनावीर : क्विंटन डी कॉक.

Story img Loader