|| शेखर हंप्रस
नवी मुंबईतील घणसोली गावात क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी करताना छातीत दुखू लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. संदीप चंद्रकांत म्हात्रे (वय ३६वर्षे ) असे या तरुणाचे नाव असून घणसोली क्रिकेट स्पर्धेत सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर छातीत दुखायला लागले म्हणून घरी जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
संदीप चंद्रकांत म्हात्रे हा घणसोली गावात राहत होता. रविवारी घणसोली गावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संदीपही सहभागी झाला होता. गोलंदाजी झाल्यावर संदीपला छातीत दुखू लागले. त्रास वाढल्याने तो घरी जायला निघाला. मात्र वाटेतच त्याची प्रकृती खालावली आणि त्याचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
संदीपच्या निधनाने गावात शोककळा
शालेय जीवनापासून संदीपने आपले नाव क्रिकेट क्षेत्रात गाजवायला सुरवात केली होती, अशी आठवण त्याचे मित्र सांगतात. दहावीला असताना संदीपने नवी मुंबई महापौर चषक क्रिकेट स्पर्धा गाजवली होती. त्याच्या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक झाले होते. क्रिकेट क्षेत्रात शेतकरी शिक्षण संस्थेचे नाव संदीपमुळेच चर्चेत आले, असे स्थानिक सांगतात. त्यानंतर स्थानिक संघातून खेळताना, घणसोली संघातर्फे खेळताना घणसोली गावचे नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये गाजवले. गजानन क्रिकेट संघाच्या अनेक विजयामध्ये संदीपचा सिंहाचा वाटा होता. अनेक स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज म्हणून संदीपचा गौरव करण्यात आला होता. संदीपच्या अकाली निधनाने म्हात्रे कुटुंबीयांसह त्याच्या मित्रांनादेखील धक्का बसला आहे.
‘टेनिस क्रिकेटमध्ये मागील एक वर्षांमध्ये घडलेली ही चौथी घटना आहे. तरुण वयात मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच आपल्या बदलत्या जीवनशैलीबाबत विचार करायला हवा’, अशी प्रतिक्रिया संदीपचा बालमित्र राहुल शिंदे याने दिली.