डेव्हिस चषकाच्या मुद्दय़ावरून एआयटीए आणि टेनिसपटू यांच्यात सुरू असलेला वाद लाजिरवाणा असून, याप्रकरणी दोघांनीही समजूतदारपणा दाखवत तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे उद्गार ज्येष्ठ टेनिसपटू आनंद अमृतराज यांनी काढले.
हे प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच एआयटीए आणि खेळाडूंनी समोरासमोर बसून चर्चा करणे गरजेचे आहे. एआयटीएने डेव्हिस चषकासाठी आता संघाची निवड केली आहे. या संघाला पाठिंबा देत शुभेच्छा देणे हे आपले काम आहे. आपण कोरियावर मात करू अशी आशा आहे आणि त्यानंतर या प्रकरणाबाबत ठोस निर्णय होऊ शकेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
तुमच्या काळात टेनिसपटूंचा निर्णयप्रक्रियेत किती सहभाग होता, याबाबत विचारले असता अमृतराज म्हणाले, सत्तरीच्या दशकात विजय आणि मी खेळत होतो, तेव्हा आम्ही एकेरी आणि दुहेरी प्रकारात सहभागी झालो. त्यावेळी निर्णयप्रक्रियेत आमचा खूप सहभाग असे मात्र संघाचे स्वरूप कसे असावे, याबाबत आम्ही निर्णय घेत नसू हे त्यांनी स्पष्ट केले.
विजय अमृतराज कर्णधार होते. आम्ही अतिशय सुरेख खेळ केला. संघटनेशी आमचे सलोख्याचे संबंध होते. सुरळीतपणे स्पर्धेचे आयोजन होत असे. आता तसे का होत नाही हे समजत नाही. नव्या संघाला माझ्या शुभेच्छा. हा संघ कोरियाचे आव्हान पार करेल अशी मला आशा आहे, असे आनंद यांनी पुढे सांगितले.