अंदमान आणि निकोबार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, असा प्रवाह ढोबळपणे जनसामान्यांच्या मनात आहे. सुनामीच्या तडाख्यात तिनेही काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. जवळपास आठवडाभर ती आई-बाबांपासून दुरावली होती. एका झाडावर तिने आठवडाभर काढला. पण जगण्याची जिद्द मात्र तिने सोडली नाही. सुनामीमध्ये त्यांचे सारे काही वाहून गेले होते, त्यानंतर त्यांनी ते नव्याने उभारले. त्यावेळी ती नऊ वर्षांची होती. पण या अनुभवाने ती अधिक धीट झाली. अपघाताने ती आंतरशालेय सायकलिंग स्पर्धेत उतरली आणि २ मार्चपासून लंडनमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. ही कहाणी आहे मृत्यूच्या दाढेतून परतून सायकलिंगमध्ये जगभरात भारताचा तिरंगा फडकावू पाहणाऱ्या २१ वर्षीय देबोरा हेरॉल्डच्या प्रबळ इच्छाशक्तीची, एका जिद्दीची, विजीगिषू वृत्तीची आणि असीम चिकाटीची.
लहानपणी धावण्याच्या स्पर्धेत देबोरा भाग घ्यायची. मजा म्हणून सायकलने हिंडायची. एका स्पर्धेत एक सायकलपटू आली नसल्याने तिला खेळण्यासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी तिचे कौशल्य पाहून सारेच भारावले. तिथेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) काही व्यक्तींना तिच्या खेळाची भुरळ पडली. त्यांनी तिला साइमध्ये सरावासाठी बोलावले. जिद्द आणि जिंकण्याची इच्छाशक्ती पाहून तिला नवी दिल्लीच्या केंद्रामध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकांचा धडाला लावत तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. आता तिला विश्व अजिंक्यपद खुणावते आहे.
‘‘जागतिक स्पर्धेत खेळणारी मी पहिली भारतीय खेळाडू असल्याचा नक्कीच आनंद होत आहे. ही माझी पहिलीच जातगिक स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत मला पदक मिळेलच, याची मी शाश्वती देत नाही. माझ्यासाठी हा अनुभव फार महत्त्वाचा असेल. ऑलिम्पिक २०२०मध्ये पात्र ठरणे हे माझे ध्येय असून त्यासाठी मी प्रयत्न करेन,’’ असे देबोरा म्हणाली.
‘सायकलिंगच्या स्पिंट्र’ या प्रकारत तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रम आहे. त्याचबरोबर जागतिक सायकलिंग क्रमवारीमध्ये देबोरा चौथ्या क्रमांकावर आहे. सायकलिंगमध्ये काही तरी करून दाखवण्याचा ध्यास घेतलेली देबोरा गेल्या दोन वर्षांपासून घरी गेलेली नाही. याबाबत ती म्हणाली की, ‘‘दोन वर्षांपासून मी घरी गेलेली नसली, तरी त्यांच्याशी रोज बोलणे होते. मला देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे आणि तेच माझे ध्येय आहे.’’ देबोराह पाहून आता अंदमानमध्ये सायकलिंग या खेळाची चांगली वाढ होत आहे.
देबोराच्या सायकलसाठी मदतीची गरज
‘‘देबोराच्या कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावत चालला आहे. तिला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा साइकडून मिळत आहेत. पण जागतिक दर्जावर खेळण्यासाठी ज्या पद्धतीची सायकल हवी ती मात्र तिच्याकडे नाही. जागतिक स्तरावरील खेळाडू जी सायकल वापरतात त्याची किंमत १२ लाख रुपये एवढी आहे. ही सायकल घेण्याइतपत तिची आर्थिक परिस्थिती सुदृढ नाही. त्यामुळे समाजातून काही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन तिच्या सायकलसाठी आर्थिक मदत द्यावी, ’’ असे आवाहन तिचे प्रशिक्षक आर. के. शर्मा यांनी केले आहे.