अबू धाबी टी-१० लीग २०२२ चा अंतिम सामना रविवारी पार पडला. हा अंतिम सामना डेक्कन ग्लॅडिएटर्सने विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स यांच्यात पार पडला. शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा ३७ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. दरम्यान निकोलस पूरन आणि डेव्हिड विसे या विजेतेपदाचे नायक ठरले.
या सामन्यात न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे डेक्कन ग्लॅडिएटर्सने प्रथम फलंदाजी केली. ज्यामध्ये निकोलस पूरन आणि डेव्हिड विसेच्या शानदार खेळीच्या जोरावर संघाने ४ बाद १२८ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूयॉर्क स्ट्रायकर्सला विजयासाठी १२९ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु प्रत्युत्तरात न्यूयॉर्क स्ट्रायकर्सला ५ बाद ९१ धावाच करता आल्या. त्यामुळे डेक्कन ग्लॅडिएटर्सने ३७ धावांनी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियात गेल्या महिन्यात संपलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मधील खराब फॉर्मनंतर, पूरनने टी-२० लीगमध्ये आपला फॉर्म परत मिळवला. तसेच डेक्कन ग्लॅडिएटर्सला अबू धाबी टी-१० लीगचे विजेतेपद पटकावून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर १८ चेंडूत ४३ धावा आणि दोन झेल घेतल्याबद्दल डेव्हिड विसेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दरम्यान कर्णधार निकोलस पूरनला या स्पर्धेत सर्वाधिक ३४५ धावा केल्याबद्दल टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
निकोलस पूरन (२३ चेंडूत ४० धावा) आणि डेव्हिड विसे (१८ चेंडूत ४३* धावा) यांनी न्यूयॉर्क स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेतला. दोघांनी आणि चौथ्या विकेटसाठी केवळ ३१ चेंडूत ७४ धावा फटकावल्या. ज्यामुळे डेक्कन ग्लॅडिएटर्सला १० षटकात १२८ धावा करता आल्या. दुसरीकडे, न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून अकील हुसेनने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या, तर किरॉन पोलार्ड आणि वहाब रियाझ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
विजयासाठी १२९ धावांचा पाठलाग करताना न्यूयॉर्क स्ट्रायकर्सची सुरुवात निराशाजनक झाली. कारण पॉल स्टर्लिंग (६), मुहम्मद वसीम (०) आणि इयॉन मॉर्गन (०) अवघ्या १३ धावांवर बाद झाले. त्यानंतर आझम खान (१६), जॉर्डन थॉम्पसन (२२*) आणि कर्णधार किरॉन पोलार्ड (२३) यांनी स्ट्रायकर्सना साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संघ डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही. त्यामुळे १० षटकांत केवळ ९५ धावाच करू शकला. डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून जोश लिटल आणि मोहम्मद हसनैन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर झहीर खानला एक विकेट मिळाली.