लिएण्डर पेस आणि महेश भूपतीने सप्टेंबरमध्ये डेव्हिस चषकाच्या लढतीसाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. मात्र चाळिशी ओलांडलेल्या या खेळाडूंना निवडायचे की नव्या दमाच्या खेळाडूंना संधी द्यायची याबाबत निवड समितीला योग्य विचार करावा लागेल, असे मत अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सचिव भरत ओझा यांनी व्यक्त केले. संघटनेच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या ओझा यांच्या वक्तव्यामुळे पेस-भूपतीचे पुनरागमन सहज होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र सप्टेंबरमध्ये सर्बियाविरुद्ध भारतात होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या निमित्ताने वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस आणि महेश भूपती यांनी या लढतीसाठी उपलब्ध असल्याचे सूचित केले होते. लंडन ऑलिम्पिकसाठी संघनिवडीसंदर्भात झालेल्या वादामुळे भूपतीने अखिल भारतीय टेनिस संघटनेशी फारकत घेतली होती, तर पेसने या वर्षभरात वैयक्तिक कारणांमुळे आपण उपलब्ध नसू, असे स्पष्ट केले होते; पण आता मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. पेस तसेच भूपतीने डेव्हिस चषकात देदीप्यमान कामगिरी करत भारताला शानदार यश मिळवून दिले आहे.
ओझा पुढे म्हणाले, ‘‘युवा खेळाडूंवर विश्वास ठेवायचा का पुन्हा मागे जात चाळिशी ओलांडलेल्या खेळाडूंची निवड करायची याविषयी कर्णधार आनंद अमृतराज आणि प्रशिक्षक झिशान अली यांचा समावेश असलेली निवड समिती योग्य निर्णय घेईलच. १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत भारतात होणाऱ्या लढतीसाठी संघाची निवड जुलैमध्ये होणार आहे. सध्या डेव्हिस चषक संघाचा भाग असलेले खेळाडू ग्रास कोर्टच्या तुलनेत हार्ड कोर्टला पसंती देतात, त्यामुळे सर्बियाविरुद्धची लढत बहुतांशी हार्डकोर्टवर होईल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा