नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या धर्तीवर महाराष्ट्रात गिर्यारोहण व प्रस्तरारोहणाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी गिरिप्रेमी संस्थेने गार्डियन कापरेरेशनच्या सहकार्याने मुळशीत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गिरिप्रेमी एव्हरेस्ट मोहिमेचे नेते उमेश झिरपे व गार्डियन कापरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मनीष साबडे यांनी येथे ही घोषणा केली. गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिअरींग या नावाने ही संस्था कार्यरत असणार आहे. मुळशी परिसरात साडेतीन एकर जागेत ही संस्था उभारली जाणार आहे. तेथे गिर्यारोहण, प्रस्तरोहणाच्या विविध तंत्राबरोबरच आपत्कालीन व्यवस्थापन कौशल्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘गिर्यारोहण सर्वासाठी’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत सर्व वयोगटातील लोकांना तेथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोठे सभागृह, तीनशे लोक राहू शकतील एवढे वसतिगृह, अद्ययावत व्यायामशाळा, ग्रंथालय, दृकश्राव्य केंद्र आदी विविध सुविधा तेथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. गिर्यारोहकांना धावणे व अन्य पूरक व्यायाम करण्यासाठी विविध सुविधा निर्माण केल्या जातील. दीड वर्षांत या सुविधा उभारल्या जाणार आहेत.
या संस्थेची अधिकृत घोषणा एका समारंभाद्वारे केली जाणार आहे. हा समारंभ २४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कर्नाटक प्रशाला (एरंडवणा) येथे आंतरराष्ट्रीय बॉक्सर एल.सरिता देवी हिच्या हस्ते व ज्येष्ठ गिर्यारोहक एन.के.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमात गिर्यारोहण हा विषय असूनही शिकविला जात नाही. या बाबत आम्ही महाराष्ट्रातील विद्यापीठांशी संपर्क साधला आहे. तसेच वेस्टर्न हिमालयीन माउंटेनिअरींग इन्स्टिटय़ूट, नेहरू गिर्यारोहण संस्था आदी राष्ट्रीय स्तरावरील गिर्यारोहण संस्थांचे सहकार्य आम्हाला मिळणार आहे. बर्फाळ प्रदेशातील गिर्यारोहणाचा अपवाद वगळता गिर्यारोहणाचे अन्य सर्व प्रशिक्षण आमच्या संस्थेत दिले जाईल. निसर्ग व पर्यावरणाचा समतोल साधूनच सर्व सुविधा उभारल्या जाणार आहेत, असे झिरपे यांनी सांगितले.
मनीष साबडे हे गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिअरींगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत. संचालक म्हणून उदय जाधव, मेघना साबडे, उमेश झिरपे, विजय जोशी व निरंजन पळसुले यांची निवड करण्यात आली आहे. आनंद पाळंदे व उष:प्रभा पागे यांच्याकडे सल्लागारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माजी क्रिकेटपटू शंतनु सुगवेकर यांची नियुक्ती झाली आहे.

Story img Loader