नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला वैयक्तिक कारणामुळे रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. चहर अद्याप दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला नसून उर्वरित दोन ट्वेन्टी-२० सामने आणि त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याबाबतही साशंकता आहे.
चहरच्या कुटुंबातील व्यक्तीची प्रकृती ठीक नसल्याने त्याला मायदेशातच थांबावे लागल्याचे समजते. चहरने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेदरम्यान बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र, त्याला केवळ एकच सामना खेळता आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वीच त्याला घरी परतावे लागले होते.
हेही वाचा >>> WI: टी-२० विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी वाईट बातमी! निकोल्स पूरनसह ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी नाकारला केंद्रीय करार
‘‘दीपकच्या कुटुंबातील व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे तो अद्याप डरबन येथे आलेला नाही. कुटुंबातील व्यक्तीची प्रकृती नाजूक असल्याने त्याने आणखी काही काळ भारतात थांबवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) परवानगी घेतली होती. तो दक्षिण आफ्रिकेला जाणार की नाही, हे आताच सांगणे अवघड आहे. कुटुंबातील या व्यक्तीच्या प्रकृतीवर हे अवलंबून आहे,’’ असे ‘बीसीसीआय’मधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
तसेच शुभमन गिल आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा हे दोघे एकदिवसीय विश्वचषकानंतर परदेशात गेले होते. त्यामुळे त्यांना भारतीय संघातील अन्य खेळाडूंबरोबर आफ्रिकेला जाता आले नाही. परंतु हे दोघे वेळेत थेट डरबन येथे दाखल झाले.
पावसामुळे पहिला ट्वेन्टी-२० सामना रद्द
डरबन : सततच्या पावसामुळे रविवारी डरबनच्या किंग्जमिड मैदानावर होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. संततधार कायम राहिल्याने नाणेफेकही होऊ शकले नाही. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेला विशेष महत्त्व आहे. या मालिकेतील पहिला सामना वाया गेल्यामुळे आता भारताला आपल्या संघाची घडी बसवण्यासाठी केवळ पाच ट्वेन्टी-२० सामने मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचे आणखी दोन सामने होणार असून त्यानंतर जानेवारीमध्ये मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. भारत-आफ्रिका दुसरा ट्वेन्टी-२० सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे.