वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत नवोदीतांना संधी दिली. खलिल अहमदच्या जागी दिपक चहरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. दिपक चहरने ३ बळी घेत, आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

दिपक चहरने आपल्या पहिल्याच षटकात सुनिल नरिनला माघारी धाडलं. यानंतर चहरने एविन लुईस आणि शिमरॉयन हेटमायरचा बळी घेतला. पाऊस पडल्यामुळे सामना सुरु होण्यास अंदाजे सव्वातास उशीर झाला. दिपकने हवामानाचा पुरेपूर फायदा उचलत, विंडीजच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. आपल्या ३ षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये दिपक चहरने ४ धावा देत ३ बळी घेतले. या कामगिरीसह दिपक चहर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गोलंदाज –

  • दिपक चहर – ३ षटकं ४ धावा आणि ३ बळी – (१.३३ ची इकोनॉमी)
  • कुलदीप यादव – ४ षटकं १३ धावा ३ बळी – (३.२५ ची इकोनॉमी)
  • नवदीप सैनी – ४ षटकं १७ धावा ३ बळी – (४.२५ ची इकोनॉमी)
  • अमित मिश्रा – ४ षटकं २४ धावा ३ बळी – (६ ची इकोनॉमी)
  • आशिष नेहरा – ४ षटकं ३५ धावा ३ बळी – (८.७५ ची इकोनॉमी)

या कामगिरीसाठी दिपक चहरला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. शुक्रवारपासून भारत आणि विंडीज यांच्यात ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंत भारतीय संघाचं भविष्य, कर्णधार कोहलीकडून कौतुक

Story img Loader