तीन महिन्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेनंतर दीपिका कुमारी, बोम्बायला देवी आणि लक्ष्मीराणी माझी यांची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आली. या तिघी वैयक्तिक तसेच सांघिक अशा दोन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

गेल्या वर्षी कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे भारतीय महिला तिरंदाज ऑलिम्पिकमध्ये तीन स्थानांसाठी पात्र ठरल्या होत्या. याव्यतिरिक्त सांघिक स्थानासाठी पात्रता ठरण्याचा मान त्यांनी पटकावला होता.

सहा महिन्यांच्या खडतर निवड चाचणी आणि प्रशिक्षणानंतर या तिघींची ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आली आहे. जमशेदपूर, दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात भारतातील अव्वल सहा तिरंदाज सहभागी झाले होते. भारतीय तिरंदाजी संघटनेने यासंदर्भात घोषणा केली.

महिला संघाबरोबरच तिरंदाजी संघटनेने पुढील महिन्यात अंताल्या, टर्की येथे होणाऱ्या तिरंदाजी विश्वचषकासाठीच्या भारतीय पुरुष संघाचीही घोषणा केली. या संघात जयंत तालुकदार, अतन्यू दास आणि मंगल सिंग चांपिआ यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे पुरुष गटात भारताने ऑलिम्पिकसाठी एक स्थान निश्चित केले आहे. अंताल्या येथील स्पर्धेत भारतीय पुरुष संघ पात्र ठरल्यास भारताच्या आणखी दोन खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. तसे झाले नाही तर रिओसाठी एका भारतीय तिरंदाजाची निवड करण्यासाठी भारतीय तिरंदाजी

संघटना निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करेल.

Story img Loader