यूपी वॉरियर्सची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हॅटट्रिक घेत इतिहास रचला. या लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी दीप्ती पहिली खेळाडू ठरली आहे. दीप्तीच्या या दमदार गोलंदाजीमुळे यूपी संघाने एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला. दीप्तीने या सामन्यात एकूण ४ विकेट घेतल्या.
दीप्तीच्या चमकदार कामगिरीची सुरुवात कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगला लेग-बिफोर विकेटद्वारे बाद करून झाली. १९व्या षटकात दीप्ती शर्माला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. लॅनिंगनंतर तिने अप्रतिम गोलंदाजी करत ॲनाबेल सदरलँड आणि अरुंधती रेड्डी यांच्या विकेट घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सला यूपी वॉरियर्सकडून एका धावेने पराभूत करण्यात या विकेट्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. दीप्तीने कधी हॅट्ट्रिक घेतली हे मैदानापासून समालोचनापर्यंत कोणालाच कळले नाही.
महिला प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा एका धावाने पराभव केला. दीप्ती शर्माला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले, जिने ५९ धावा करत संघाची धावसंख्या १३८ पर्यंत नेली. अष्टपैलू खेळी करत दीप्तीने ४ विकेट्सही घेतल्या. दीप्ती ही महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या इझी वोंगनंतर हॅटट्रिक घेणारी दुसरी खेळाडू ठरली. वोंगने गेल्या वर्षी एलिमिनेटरमध्ये वॉरियर्सविरुद्ध ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे त्या हॅट्ट्रिक विकेटमध्ये दीप्तीचाही सहभाग होता.
दीप्ती शर्मा ही गोलंदाजीसोबतच एक शानदार फलंदाजही आहे. दीप्तीला दिल्लीविरुद्धच्या सामन्याच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला धाडले. फलंदाजीत यूपीचे इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत, पण दुसऱ्या टोकाला दीप्ती शर्माने आघाडी कायम ठेवली.तिने ४८ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या.
वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९.५ षटकांत १३७ धावांवर आटोपला. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या दीप्ती शर्मानेही फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. यूपी वॉरियर्सला आतापर्यंत या स्पर्धेत खूप संघर्ष करावा लागला आहे. दिल्लीविरुद्धच्या विजयापूर्वी, यूपी संघाने ६ सामने खेळले होते, परंतु केवळ दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवण्यात यश आले होते. अशा स्थितीत दिल्लीविरुद्धचा विजय यूपीसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे.