Deepti Sharma made London Spirit the champion by hitting a six : भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने आपल्या बॅटने इंग्लंडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. तिने लंडन स्पिरिट संघाला वेल्श फायरविरुद्ध षटकार मारून विजय मिळवून दिला. ज्यामुळे लंडन स्पिरिट संघाने द हंड्रेडच्या ट्रॉफीवर नाव कोरले. लंडन स्पिरिट संघाचे हे पहिले द हंड्रेड जेतेपद आहे. आता दीप्तीने शर्माने मारलेल्या विजयी षटकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महिलांच्या द हंड्रेड फायनलमध्ये वेल्श फायरने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून ११५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लंडन स्पिरीट संघाने ९८व्या चेंडूवर ६ गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.
लंडन स्पिरिट संघाने पहिल्यांदाच जेतेपद पटकावले –
द हंड्रेडच्या अत्यंत रोमांचक फायनलमध्ये भारतीय स्टार दीप्ती शर्माच्या १६ चेंडूत १६ धावांच्या खेळीने लंडन स्पिरिटला चॅम्पियन बनवले. संघाने प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे. लंडन संघाकडून जॉर्जिया रेडमनने सर्वाधिक ३४ धावा केल्या. याशिवाय कर्णधार हीदर नाइटने २४ धावांची खेळी केली. दीप्ती शर्मा खालच्या फळीत फलंदाजीसाठी आली आणि आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. तिने केवळ धावांचा वेग कायम राखला नाही तर शेवटी षटकार खेचून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
शेवटी विजयासाठी ५ चेंडूत ६ धावा हव्या होत्या –
१०० चेंडूंच्या या सामन्यात लंडन स्पिरिट संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना ९५ चेंडू खेळून १०० धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर संघाला विजयासाठी शेवटच्या ५ चेंडूंवर ६ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर प्रत्येकी एक धावा आल्या. आता लंडन स्पिरिट संघाला ३ चेंडूवर ४ धावांची गरज होती. यावेळी स्ट्राइकवर दीप्ती शर्मा होती, जिने खणखणीत षटकार ठोकून लंडन स्पिरिट संघाला सामना जिंकून दिला.
दीप्ती ६ पैकी ५ सामन्यात नाबाद परतली –
या स्पर्धेत दीप्ती शर्मा बदली खेळाडू म्हणून सहभागी झाली होती. तिला या हंगामात ८ पैकी ६ सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये ती ५ वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतली. दीप्तीने एकूण २१२ धावा केल्या. या दरम्यान दीप्तीच्या बॅटमधून एकूण १८ चौकार आणि ६ षटकारही दिसने. दीप्तीने ४६ धावांची तिची सर्वोत्तम खेळी साकारली आहे. तिच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर तिने २२.1१५5 च्या सरासरीने एकूण ८ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये तिचा इकॉनॉमी रेट फक्त ६.९४ राहिला.