इंग्लंडमध्ये मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली. इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवत भारताने निर्भेळ यश संपादन केले. दीप्ती शर्माने घेतलेली शेवटची विकेट निर्णायक ठरली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मांकडींग) केले. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर समालोचक हर्षा भोगले यांनी इंग्लिश खेळाडूंवर टीका केली. आता इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सकडूनही यावर प्रत्युत्तर मिळाले आहे.
भारतीय संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. पण झुलनच्या निरोप समारंभापेक्षाही हा सामना अन्य काही कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दीप्ती शर्माने आयसीसीच्या नियमांमध्ये राहूनच मांकडींग पद्धतीने धावबाद केले होते. मात्र या खेळीने अनेक माजी क्रिकेटपटूंनी याला खेळ भावनेविरुद्ध म्हटले आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काहीजण दीप्ती शर्माच्या समर्थनात आहे, तर काही लोक तिच्या कृतीला विरोध करत आहे. आता या वादात इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने देखील उडी घेतली आहे. यावरूनच समालोचक हर्षा भोगले आणि स्टोक्स यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
समालोचक हर्षा भोगले यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न हे इंग्लिश खेळाडूंची मानसिक स्थिती आणि त्याची संस्कृती यावर केले आहेत. त्याला उत्तर देताना स्टोक्सने लिहिले की, “हर्षा मांकडींगवर लोकांनी मांडलेल्या प्रतिक्रिया तुम्ही संस्कृतीला मध्ये घेऊन येत आहात.”
भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले की, “ब्रिटनने जगाच्या मोठ्या भागावर दीर्घकाळ राज्य केले आहे. त्यावेळी फार थोडे प्रश्न निर्माण झाले होते. त्याचा परिणाम असा झाला की आज इंग्लंड जे चुकीचे मानते, ते बाकीच्या संघांनीही त्याच पद्धतीने स्वीकारावे व समजून घ्यावे, अशी मानसिकता तयार झाली आहे. हे जसे ऑस्ट्रेलियन लोक त्यांच्या सीमा ओलांडू नका असा उपदेश करतात. त्यांनी स्वत: त्यांच्या संस्कृतीनुसार हे तत्त्व केले आहे. ते इतरांसाठीही चांगले असेलच असे नाही. संपूर्ण जग इंग्लंडच्या विचारानुसार चालत नाही. समाजात कायद्याचे राज्य आहे, त्यामुळे क्रिकेटमध्येही ते लागू होते. मात्र लोक दीप्तीवर विनाकारण टीका करत असल्याने मी नाराज आहे. क्रिकेटच्या नियमात राहून तिने हे काम केले आहे. अशा स्थितीत तिच्यावर होणारी टीका थांबली पाहिजे.”
२०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जे घडले, त्याच्याशी हर्षा भोगले देखील सहमत असल्याचे दिसले. त्यांनी स्टोक्सला उत्तर देत लिहिले की, “असो, तेव्हा तुमची काहीच चूक नव्हती, त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे. नॉन स्ट्राईकरच्या बॅकअपसाठी इंग्लंडमधून येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी मला वाटते, जेव्हा तुम्ही खेळ शिकता आणि संस्कृतीचा भाग अशता, तेव्हा तुम्हाला हेच सांगितले जाते. जर तुझ्याकडे वेळ असेल, तर एक दिवस याविषयी बोलायला आवडेल.”
यावर बऱ्याच पोस्ट त्यांनी ट्वीटवर लिहिल्या आहेत. दीप्ती शर्मावर होत असलेल्या टीकांवर हर्षा भोगले या ट्वीटमध्ये व्यक्त झाले होते. त्यांनी एकापाठोपाठ एक असे काही ट्वीट करून स्वतःचे मत स्पष्टपणे मांडले होते. त्यांच्या मते क्रिकेटची सुरुवात ज्याठिकाणी झाली तो इंग्लंड त्यांचे विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे.