चेन्नई : अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव पचवणे नक्कीच अवघड आहे. आम्ही अत्यंत निराशाजनक खेळ केला. आता कामगिरी उंचवायची असल्यास आमच्या मानसिकतेत आणि योजनांमध्ये बदलांची गरज आहे, असे मत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने व्यक्त केले.
एकदिवसीय विश्वचषकात सोमवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. यंदाच्या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा पाच सामन्यांत तिसरा पराभव होता. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अवघड जाणार आहे. पाकिस्तानच्या संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत एकत्रित चांगली कामगिरी करता येत नसल्याने या अपयशाला सामोरे जावे लागत असल्याचे बाबरने कबूल केले.
हेही वाचा >>> Team India: BCCIने वर्ल्ड कपच्या मध्यावर टीम इंडियाबाबत घेतला मोठा निर्णय, ‘या’ गोष्टींवर घातली बंदी
‘‘आम्ही जेव्हा गोलंदाजीत चांगली कामगिरी करतो, तेव्हा आमचे फलंदाज अपयशी ठरतात. कधी आम्ही उत्तम फलंदाजी करतो, पण त्या वेळी क्षेत्ररक्षणात चुका करतो,’’ असे बाबर म्हणाला. विशेषत: क्षेत्ररक्षणातील कामगिरीबाबत बाबरने नाराजी व्यक्त केली. ‘‘क्षेत्ररक्षण करताना आमच्या खेळाडूंमध्ये उत्साह किंवा कोणताही हेतू दिसत नाही. क्षेत्ररक्षक म्हणून तुम्ही केवळ चेंडूवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. तुमच्या डोक्यात अन्य विचार असल्यास तुमच्याकडून चुका होणारच. आम्ही याची काळजी घेतली पाहिजे,’’ असे बाबरने नमूद केले.
नसीमची उणीव जाणवते
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीचा संघाला फटका बसत असल्याचे बाबरने नमूद केले. ‘‘नसीमची उणीव आम्हाला नक्कीच जाणवते आहे. मात्र, तो वगळता आमचे सर्वच प्रमुख गोलंदाज या स्पर्धेत खेळत आहेत. त्यांची विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. परंतु या स्पर्धेत त्यांना अद्याप अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही,’’ असे बाबर म्हणाला.