हैदराबाद : पंकज मोहिते आणि मोहित गोयत (प्रत्येकी चार गुण) यांनी चढाईत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर गौरव खत्रीने (सात गुण) बचावात दाखवलेल्या चपळाईच्या जोरावर गतविजेत्या पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामाला विजयी सुरुवात केली. शनिवारी झालेल्या लढतीत त्यांनी गतउपविजेत्या हरियाणा स्टीलर्स संघाला ३५-२५ अशा फरकाने नमवले.
हेही वाचा >>> श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचा दबदबा ; दुसऱ्या डावात ऋतुराजकडून प्रतिकार; पण महाराष्ट्र १७३ धावांनी पिछाडीवर
हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. मात्र, १३व्या मिनिटाला पुणेरी संघाने हरियाणावर पहिला लोण चढवत १३-७ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला पुणेरी संघाकडे १९-१३ अशी आघाडी होती. पहिल्या सत्रात पुणेरीकडून अस्लम ईनामदार, पंकज आणि मोहित गोयत यांनी चमक दाखवली. दुसऱ्या सत्रात हरियाणा संघाने आपला खेळ उंचावला. मात्र, पुणेरी संघाने सामन्याला दोन मिनिटे शिल्लक असताना हरियाणावर दुसरा लोण चढवत विजय निश्चित केला. त्यापूर्वी, दिवसाच्या पहिल्या सामन्यात तमिळ थलायवाजने यजमान तेलुगू टायटन्स संघाला ४४-२९ असे पराभूत केले. मध्यंतराला तमिळकडे २०-१७ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात तमिळ संघाने आपला खेळ आणखी उंचावला आणि तेलुगूला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली नाही. तमिळ संघाने सामन्यात तेलुगूवर दोन लोण चढवले. तमिळकडून नरेंदर होशियार आणि सचिन (१० गुण) यांनी चढाईत चमक दाखवली. साहिलने (५ गुण) बचावात चांगली कामगिरी केली. तेलुगूकडून पवन सेहरावत (१० गुण) आणि विजय मलिक (९ गुण) यांनाच झुंज देता आली.