Sai Sudharsan hits double century in Ranji Trophy 2024-25 : आयपीएल २०२४ मध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या साई सुदर्शनने गुजरात टायटन्स संघासाठी खूप धावा केल्या होत्या. आता आयपीएल २०२५ साठी खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख जवळ येत आहे. कारण प्रत्येक संघाला ३१ ऑगस्टपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. तत्पूर्वी, आयपीएल २०२४ मध्ये गुजरातकडून खेळलेल्या साई सुदर्शनने रणजीच्या या हंगामातील एलिट गट डी सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना पहिल्या डावात द्विशतक झळकावले आहे.
साई सुदर्शनचे वादळी द्विशतक –
साई सुदर्शनच्या द्विशतकाच्या जोरावर तामिळनाडू संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक गडी गमावून ३७९ धावा केल्या आहेत. दुहेरी शतक झळकावल्यानंतर साई सुदर्शन नाबाद आहे आणि वॉशिंग्टन सुंदरही पहिल्या दिवशी ९६ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दिल्लीविरुद्ध तामिळनाडूने आपली स्थिती चांगलीच मजबूत केली आहे. या सामन्यात साई सुदर्शनने २५९ चेंडूचा सामना करताना २३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २०२ धावा केल्या आहेत.
या सामन्यात साईने संघाचा कर्णधार आणि त्याचा सहकारी सलामीवीर फलंदाज एन जगदीसनलह पहिल्या विकेटसाठी १६८ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. जगदीशनने पहिल्या डावात ६५ धावा केल्या आणि तो नवदीप सैनीच्या चेंडूवर बाद झाला. आता वॉशिंग्टन सुंदर सध्या साईसह क्रीजवर आहे. तो १७० चेंडूंचा सामना केल्यानंतर ९६ धावांव नाबाद आहे. सुंदरने आतापर्यंत एक षटकार आणि १२ चौकार मारले असून तो शतकाच्या जवळ आहे.
साई आणि सुंदरची २११ धावांची नाबाद भागीदारी –
साई आणि सुंदर यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी पहिल्या डावात २११ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. तर साईने आयपीएल २०२४ मध्ये गुजरातसाठी शानदार फलंदाजी केली होती. त्याने १२ सामन्यात एका शतकासह ५२७ धावा केल्या होत्या. तो गुजरात टायटन्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे त्याची देशांतर्गत स्तरावर कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे, त्यामुळे गुजरात टायटन्स संघ त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएल २०२५ साठी रिटेन करु शकतो.