दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनन शर्मा याने भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. आता तो चांगल्या संधींसाठी कॅलिफोर्नियाला जाईल. मनन ३० वर्षांचा आहे. माजी भारतीय खेळाडू अजय शर्मा यांचा मुलगा मनन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराट कोहली, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर केला आहे.
२०१७ मध्ये दिल्लीत पदार्पण केल्यापासून त्याने ३५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २७.४५च्या सरासरीने १२०८ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका अर्धशतकासह त्याच्या नावावर ५६० धावा आहेत. त्याने ११३ प्रथम श्रेणी विकेट्स देखील घेतल्या आहेत आणि २६ टी-२० सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2021 : पंजाब किंग्जला जबर धक्का, २२ कोटींचे दोन खेळाडू स्पर्धेबाहेर!
आयपीएलमध्ये मनन शर्माला २०१६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने १० लाखांच्या मूळ किमतीसह खरेदी केले होते. २०१०च्या अंडर १९ विश्वचषकादरम्यान तो भारतीय संघाचा भाग होता. भारत सोडून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेणारा तो तिसरा खेळाडू आहे.
उन्मुक्त चंद, समित पटेल यांचीही निवृत्ती
यापूर्वी उन्मुक्त चंद आणि समित पटेल यांनीही अमेरिकेत जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या संधीच्या शोधात त्यांनी भारतीय क्रिकेटला निरोप दिला. उन्मुक्त चंदने अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्ससोबत करार केला आहे.
”मी देशासाठी कधीही खेळू शकणार नाही हे दु: खद आहे, पण राजकारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाबद्दल मी भावूक झालो आहे”, असे उन्मुक्त चंदने सांगितले होते. उन्मुक्त चंद गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नव्हता आणि त्याला भारतात क्रिकेट खेळण्याची संधीही मिळत नव्हती. ही परिस्थिती पाहता त्यांनी नवीन संधी शोधण्यासाठी अमेरिकेत जाणे योग्य मानले.