भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पंत दिल्लीहून रुरकी येथे आपल्या घरी आईला भेटण्यासाठी जात होता. दिल्ली-देहरादून महामार्गावर पहाटे ५.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपचारासाठी त्याला दिल्लीला नेलं जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार “पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी आमचं एक पथक देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात जात आहे. गरज पडल्यास आम्ही त्याला दिल्लीला घेऊन येऊ. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी त्याला एअरलिफ्ट करत दिल्लीला आणलं जाण्याची दाट शक्यता आहे”.
उत्तराखंडमधील हरिद्धार जिल्ह्यात एका वळणावर पंतची गाडी दुभाजकावर आदळली आणि अनियंत्रित झाली. अपघातामुळे गाडी अनेकदा पलटली आणि पेट घेतला. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला आहे. नजीकच्या सक्षम रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला देहरादून येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ
हरयाणा बससेवेचा चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी पंतला जळत्या कारमधून बाहेर पडण्यास मदत केली. “पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पंतच्या कारचा अपघात झाला. पंतने दिलेल्या माहितीनुसार, त्याला झोप लागल्याने कारने रस्ता सोडला आणि दुभाजकाला जाऊन आदळली. अपघातानंतर कारला आग लागली होती. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्याला देहरादूनला हलवण्यात आलं,” अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली आहे.