Marizanne Kapp Bowling Video Viral : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगतदार सामना झाला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या फलंदाजांना पॉवर प्ले मध्ये आक्रमक सुरुवात करता आली नाही. कारण दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाज मारिझान कापने गुजरातच्या महत्वाच्या फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. एकट्या कापने गुजरातचे ५ गडी बाद करून दिल्लीसाठी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे गुजरातने ९ गडी गमावत २० षटकात १०५ धावांची मजल मारली. मारिझानच्या गोलंदाजीचा व्हिडीओ डब्ल्यूपीएलच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.
गुजरातने १०६ धावांचं दिल्लीला आव्हान दिलं होतं. पण दिल्लीच्या सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंगने आक्रमक खेळी करून अवघ्या ७ षटकांत १०७ धावा कुटल्या आणि दिल्लीला मोठा विजय मिळवून दिला. शफाली वर्माने फक्त २८ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी करुन शफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्सला दणदणीत विजय मिळवून दिला. तर कर्णधार मेग लॅनिंगने १५ चेंडूत २१ धावा केल्या. शफालीने १० चौकार आणि ५ षटकार मारून चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे फक्त ७.१ षटकात १०७ धावा करून दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा दारूण पराभव केला.
इथे पाहा व्हिडीओ
गुजरातसाठी मैदानात फलंदाजीला उतरलेल्या सलामीवीर सबिनेनी मेघनाला भोपळाही फोडता आला नाही. लॉरा वॉलवर्थने फक्त एक धाव केली. कारण मारिझान कापने या दोन्ही फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर हरलीन देओलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हरलीनने १४ चेंडूत २० धावा केल्यानंतर पुन्हा एकदा मारिझानने हरलीनला पायचीत करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर दयालन हेमलता ५ धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर कापच्या शेवटच्या षटकात सुष्मा वर्माची दांडी गुल झाली. सुष्माने १० चेंडूत फक्त २ धावा केल्या. जॉर्जिया वॅरेहमने २५ चेंडूत २२ धावा केल्या. दिल्लीच्या राधा यादवने जॉर्जीयाला क्लीन बोल्ड केलं. तसंच गुजरातची कर्णधार स्नेह राणा शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बाद झाली.