Delhi Capitals shared an emotional video of Rishabh Pant : भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा गेल्या वर्षी याच दिवशी कार अपघात झाला होता. शनिवारी (३० डिसेंबर) अपघाताला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला. पंत या संघाचा कर्णधार आहे. दिल्ली कॅपिटल्सने सांगितले की, तो धमाकेदार पुनरागमन करण्यास तयार आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. फ्रँचायझीने त्याला रिटेन केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, त्या भयंकर रात्रीपासून ३६५ दिवस उलटले आहेत. तेव्हापासून, कृतज्ञता, विश्वास, कठोर परिश्रम आणि कधीही न म्हणू न मरण्याची वृत्ती त्याच्या नसांमधून दररोज खेळात जोरदार पुनरागमन करते. धाडसी, उत्साही ऋषभ पंत २.० लवकरच अॅक्शनमध्ये दिसणार आहे. डेव्हिड वॉर्नर, अक्षर पटेल, रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचे मत व्यक्त केले.
प्रथम मला वाटले हा भाऊ गेला – अक्षर पटेल
अक्षर पटेलने व्हिडीओमध्ये सांगितले की, “सकाळी सात किंवा आठ वाजता प्रतिमा दीदींनी मला कॉल केला. त्याने मला विचारले की तू ऋषभशी शेवटचे कधी बोलला होतास. मी म्हणालो की मी त्याला कॉल करणार होतो, पण केला नाही. त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडे ऋषभच्या आईचा फोन नंबर असेल तर पाठव. आधी वाटलं की हा भाऊ गेला. बीसीसीआय आणि शार्दुलसह सर्वांनी मला फोन केला. पंत माझ्याशी शेवटचा बोलला असणार हे सर्वांना माहीत होते. मी पंतशी बोललो. फोन केल्यावर कळलं की सगळं ठीक आहे. त्याला दुखापत झाली आहे. यानंतर माझ्या जीवात जीव आला. तो आता लढणार हे मला माहीत होतं.”
पंतचा अपघात कसा झाला?
३० डिसेंबर २०२२ रोजी पंत कारने आपल्या घरी जात होता आणि अपघाताच्या वेळी तो एकटाच होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याची मर्सिडीज कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रेलिंगला धडकली. यानंतर कारने पेट घेतला आणि उलटली. गाडी चालवताना पंतला डुलकी लागली होती. यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. पंतच्या डोक्याला, पाठीवर आणि पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या.
भरधाव वेगात असलेली कार आधी दुभाजकावर आदळली आणि नंतर मजबूत लोखंडी बॅरिकेडिंगला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार चुकीच्या बाजूला जाऊन पडली. कार रस्त्यावर घासत जाऊन सुमारे २०० मीटर अंतरावर जाऊन थांबली. यानंतर आग लागली. आग लागण्यापूर्वी पंत स्वत: गाडीची काच फोडून बाहेर पडला. त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले.