गुजरात लायन्सविरुद्ध आज सामना; राजकोटमधील अखेरची लढत
गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात लायन्स संघाला तळाला असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता; पण मंगळवारी होणाऱ्या सामन्यात त्यांना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात विजयाच्या वाटेवर येण्याची संधी असेल. घरच्या मैदानावर गुजरातचा हा अखेरचा सामना असून हा सामना जिंकून त्यांना राजकोटच्या मैदानात शेवट गोड करता येऊ शकेल. या दोन्ही संघांमधील पहिला सामना चांगलाच रंगतदार झाला होता. या सामन्यात गुजरातने दिल्लीवर फक्त एका धावेने विजय मिळवला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दिल्लीचा संघ आतुर असेल.
सलग तीन सामने जिंकत गुजरातने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली होती; पण पंजाबसारख्या फॉर्मात नसलेल्या संघाकडून त्यांना २३ धावांनी पराभव पकरावा लागला होता. सध्याच्या घडीला १२ गुणांसह गुजरातचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. सध्याच्या घडीला गुजरातचा संघ सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ या दोन्ही सलामीवीरांवर अवलंबून असल्याचे चित्र आहे, कारण हे दोघे खेळल्यास त्यांना मोठी खेळी साकारता येते, पण हे दोघे अपयशी ठरल्यास अन्य फलंदाजांना मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार सुरेश रैना हा ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी अव्वल फलंदाज समजला जातो, पण त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही. ड्वेन ब्राव्हो, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा यांनाही सूर गवसलेला नाही. ब्राव्होने आतापर्यंत दहा बळी मिळवले असले तरी त्याला फक्त ५२ धावाच आतापर्यंत करता आल्या आहेत. धवल कुलकर्णी आणि प्रवीण कुमार यांच्याकडून चांगला मारा पाहायला मिळत आहे.
राहुल द्रविडचे मार्गदर्शन आणि झहीर खानच्या नेतृत्वामुळे दिल्लीच्या संघाचे रूप पालटलेले दिसत आहे. आतापर्यंतच्या स्पर्धामध्ये या वर्षी त्यांची कामगिरी तुलनेत चांगली होत आहे. आतापर्यंत सहा सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे, तर गुजरात आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. क्विंटन डी’कॉकने स्पर्धेत शतक झळकावले असले तरी त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. करुण नायर आणि सॅम बिलिंग्स यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. कालरेस ब्रेटवेटकडून अजूनही झंझावाती फलंदाजी पाहायला मिळालेली नाही, पण गोलंदाजीमध्ये तो चमक दाखवत आहे. गोलंदाजीमध्ये झहीरने सातत्याने भदक मारा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून. प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून. प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.