नव्या कर्णधारासह यंदाच्या स्पर्धेत उतरलेला दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ आणि पहिल्यांदाच सहभागी झालेला गुजरात लायन्स या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केलीआहे. सध्या गुणतालिकेत गुजरातचा संघ आठ गुणांनिशी कमी सरासरीमुळे दुसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्लीचा संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यास दोन्ही संघांना अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल.
झहीर खानच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी चांगली होत आहे. क्विंटन डी’कॉकसह संजू सॅमसन, जे पी डय़ुमिनी दमदार फलंदाजी करत आहेत. पण कालरेस ब्रेथवेटकडून अजूनही अपेक्षांची पूर्तता झालेली नाही. गोलंदाजीमध्ये झहीरसह ख्रिस मॉरिस, मोहम्मद शमी भेदक मारा करत आहेत. फिरकीपटू अमित मिश्राने आतापर्यंत सातत्यातने तिखट मारा केला आहे.
आरोन फिंच हा गुजरातच्या फलंदाजाचा कणा समजला जात आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथला अजूनही हवा तसा सूर गवसलेला नाही, तर कर्णधार सुरेश रैनाला अजूनही छाप पाडता आलेली नाही. दिनेश कार्तिककडून काही उपयुक्त खेळी पाहायला मिळाल्या आहेत. ड्वेन ब्राव्होसारखा गुणवान अष्टपैलू खेळाडू त्यांच्या ताफ्यामध्ये आहे. फिरकीपटू प्रवीण तांबेने सातत्याने भेदक मारा करत संघाला बळी मिळवून देण्याचे काम चोख बजावले आहे.
दिल्लीला पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यावर विजय मिळवला आहे. गुजरातने पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, पण त्यानंतर त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. पण गेल्या रविवारी त्यांनी बंगळुरूला पराभूत करत विजयाची वाट पुन्हा एकदा शोधली आहे.

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून. प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.

Story img Loader