भारतीय कबड्डी महासंघाची निवडणूक

नवी दिल्ली : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यासंदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. ही निवडणूक १ सप्टेंबरला होणार होती.

तामिळनाडूचे माजी कबड्डीपटू ए. सी. थंगावेल यांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघ यांच्याकडून उत्तर मागवले होते. शुक्रवारी अध्यक्ष कासानी ज्ञानेश्वर मुदिराज आणि उपाध्यक्ष के. जगदीश्वर यादव यांनी केलेल्या याचिकेबाबत न्यायालय आता हस्तक्षेप करू शकणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

थंगावाल यांच्या याचिकेवर २७ ऑगस्टला एकल न्यायमूर्तीनी भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली. २०११च्या राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन करणारी ही निवडणूक प्रक्रिया नाही. राज्यांनी नामनिर्देशित केलेले अनेक प्रतिनिधी संहितेनुसार अपात्र ठरतात, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे राहुल मेहरा आणि आर. अरुणाधरी अय्यर या वकीलांनी केला.

Story img Loader