दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; भारतीय कुस्ती महासंघाला पुन्हा साकडे

ऑलिम्पिक प्रवेशासाठी चाचणी घेण्यात यावी, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करणारा आंतरराष्ट्रीय मल्ल सुशील कुमारला धक्का बसला आहे. त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली असून नरसिंग यादवचा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाविरोधात  सुशील कुमार पुन्हा भारतीय कुस्ती महासंघाकडे जाणार असून त्यांना चाचणी घेण्याची विनंती करणार आहे.

सुशील हा ६६ किलो वजनी गटामधील महान कुस्तीपटू आहे, पण ऑलिम्पकमध्ये ७४ किलो वजनी गटात खेळवणे अयोग्य आहे, असे मत न्यायमूर्ती मनमोहन यांनी व्यक्त केले. या याचिकेवर निर्णय देताना मनमोहन म्हणाले की, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणतेही पदक फक्त ताकदीच्या जोरावर जिंकता येत नाही, तर बुद्धीचाही वापर करावा लागतो. त्यामुळे अखेरच्या क्षणी चाचणी घेतल्यास ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आलेल्या कुस्तीपटूच्या सरावावर विपरीत परिणाम होऊ शकतो.’’

या वेळी कोर्टाने ३७ पानी निकालपत्रामध्ये भारतीय कुस्ती महासंघ योग्य काम करत असल्याचे म्हटले आहे. ‘‘महासंघ या प्रकरणात योग्य आणि पारदर्शी काम करत आहे,’’ असे निकालपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘‘निवडीच्या पद्धतीनुसार पात्रता स्पर्धेनंतर याचिकाकर्त्यां सुशीलने चाचणीची मागणी करणे स्वीकारार्ह नाही. आतापर्यंत एकाच पद्धतीने ऑलिम्पिकसाठी खेळाडू पाठवले जात आहेत. त्यानुसारच सर्वोत्तम खेळाडूची ऑलिम्पिकसाठी निवड केली जाते,’’ असे निकालपत्रामध्ये म्हटले आहे.

नरसिंगविषयी निकालपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘‘गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये नरसिंग यादवने कांस्यपद जिंकत भारतासाठी ऑलिम्पिक प्रवेशिका मिळवली होती. त्यानंतर राष्ट्रीय शिबिरासाठीही नरसिंगचीच निवड महासंघाने केली आहे. महासंघाच्या मते ७४ किलो वजनी गटासाठी नरसिंग हाच सर्वोत्तम कुस्तीपटू आहे. त्यानुसार ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंगच योग्य आहे.’’

ऑलिम्पिकमधून ६६ किलो वजनी रद्द करणे हे दुर्दैवी आहे, कारण या वजनी गटामध्ये सुशीलने दोन ऑलिम्पिक पदके पटकावली होती. त्यानंतर सुशीलने ७४ किलो वजनी गटामध्ये खेळण्यास पसंती दिली, पण या वजनी गटामध्ये सुशीलने आतापर्यंत एकही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावलेले नाही, असे न्यायालयाने या वेळी नमूद केले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या वेळी महासंघाने पारदर्शीपणे चाचणी घेतली होती. त्यानुसार सर्वोत्तम कुस्तीपटूला या स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. या स्पर्धेत नरसिंगने कांस्यपदक जिंकत नवा इतिहास रचला होता. या स्पर्धेत पदक पटकावून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नरसिंग हा पहिला भारतीय कुस्तीपटू आहे.

राज सिंग यांना नोटीस

न्यायालयामध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष राज सिंग यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आता आम्ही पुन्हा भारतीय कुस्ती महासंघाकडे जाणार असून त्यांना चाचणी घेण्याची विनंती करणार आहोत. जर यामध्ये आम्हाला अपयश आले तर आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात द्विसदस्यीय पीठापुढे याचिका सादर करणार आहोत.

– सुशील कुमार, आंतरराषाट्रीय कुस्तीपटू

सुशील कुमारने निष्पापपणे फक्त चाचणीची मागणी केली होती, पण त्यामुळे ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या कुस्तीपटूच्या जिंकण्याचा मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर चाचणी घेतली तर ते राष्ट्रीय हिताला बाधा आणणारे ठरेल आणि त्यामध्ये देशाचेच नुकसान होईल. हे सारे लक्षात घेता कायद्याच्या दृष्टीने चाचणी घेणे असमर्थनीय आहे. त्यामुळेच सुशीलची याचिका फेटाळण्यात येत आहे.

– मनमोहन, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

उच्च न्यायालयाच्या निकालाने सुशील फार निराश झाला आहे. सध्याच्या घडीला तो सर्वात जास्त तंदुरुस्त आहे आणि चांगल्या फॉर्मातही आहे. ७४ किलो वजनीगटातील प्रत्येक खेळाडूला त्याने सरावात पराभूत केले आहे, त्याचबरोबर १२० किलो वजनी गटातील कुस्तीपटूशी सरावामध्ये दोन हात करायला तो सज्ज आहे.

– सतपाल सिंग, सुशीलचे प्रशिक्षक

Story img Loader