अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी पटेल यांची झालेली निवड रद्द करत पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमधून राष्ट्रीय क्रीडा संहितेचं उल्लंघन झाल्याचं मतही दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. याचसोबत दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्य निवडणुक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रीडा क्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्या. नजमी वाझिरी यांच्या खंडपीठाने प्रफुल पटेल यांची निवड रद्दबातल ठरवली.

अवश्य वाचा – युवा विश्वचषक आयोजनाचे भारताचे स्वप्न तूर्तास दूर?

२००९ साली प्रफुल पटेल यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. यानंतर आजपर्यंत प्रफुल पटेल फुटबॉल महासंघावर एकमताने निवडून येत आहेत. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात फुटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या निवडीला मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर आज अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला.

२००८ साली फुटबॉल महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांचं निधन झालं. यानंतर पटेल यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. पटेल यांच्याच नेतृत्वाखाली फुटबॉल महासंघाने फिफाच्या १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं होतं. याचसोबत भारताने २०१९ साली १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाच्या यजमानपदासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi high court sets aside praful patel appointment as a aiff president orders new election in 5 months