उद्यापासून (९ जून) भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनने सर्व पूर्वतयारी केली आहे. मात्र, या दोन संस्थांव्यतिरिक्त आणखी एक संस्था आहे जिने या सामन्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ती म्हणजे दिल्ली मेट्रो! आता कदाचित तुम्ही म्हणाल क्रिकेटचा सामना आणि मेट्रोचा काय संबंध? पण, ही गोष्ट एखदम खरी आहे. दिल्ली मेट्रोने भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी आपल्या वेळापत्रकात खास बदल केले आहेत.

दिल्ली मेट्रोने गुरुवारी म्हणजेच ९ जून २०२२ रोजी आपल्या गाड्यांच्या वेळेत विशेष बदल केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी ट्वेंटी सामन्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. ९ जून रोजी दिल्लीतील शेवटच्या मेट्रोची वेळ ५० मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. ही वेळ सर्व मेट्रो मार्गांसाठी लागू करण्यात आली आहे. सध्या बहुतांश मार्गावरील शेवटची मेट्रो सकाळी ११ वाजेपर्यंतच धावते. मात्र, प्रवाशांना सामन्याच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो मिळेल.

अरुण जेटली स्टेडियम हे दिल्ली मेट्रोच्या व्हायलेट लाईनजवळ आहेत. या स्टेडियमच्या सर्वात जवळ दिल्ली गेट आणि आयटीओ मेट्रो स्थानके आहेत. ही स्थानके काश्मीर गेट ते राजा नाहर सिंगवाली मेट्रोच्या मार्गावर येतात. त्यामुळे सामना संपल्यानंतर जवळच्या मेट्रो स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) वेळ वाढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डीएमआरसीने एक अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा – रवी शास्त्रींच्या एका ट्विटने मिळाला ३६ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा, जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

या बदलांमुळे दिल्ली मेट्रो टी ट्वेंटी सामन्याच्या दिवशी एकूण ४८ अतिरिक्त फेऱ्या मारणार आहे. ९ जून रोजी काश्मीर गेटपासून मध्यरात्री १२ पर्यंत शेवटची मेट्रो उपलब्ध असेल. भारतीय लोक क्रिकेटसाठी काहीही करू शकतात, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Story img Loader