आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील तिन्ही दोषी खेळाडू ज्या विविध हॉटेल्समध्ये वास्तव्याला होते तिथून सीसीटीव्ही चित्रीकरणाची मागणी केली आहे. मुंबई, चंदिगढ, कोलकाता आणि हैदराबाद येथील हॉटेल्समधून पुरावे गोळा करण्यासाल्ली दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. चित्रीकरणाबरोबरच या तिघांच्या आवाजांचे नमुने गोळा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्नशील आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंच्या यासंदर्भात काही चर्चा मुंबई, चंदिगढ, कोलकाता आणि हैदराबाद येथील हॉटेल्समध्ये झाल्या होत्या, त्यामुळे या हॉटेल्समधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचे पुरावे गोळा करण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या तिन्ही दोषी खेळाडूंविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी फसवणूक आणि गुन्हेगारी षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. पोलीस निरीक्षक बद्रीश दत्त यांनी ही तक्रार दाखल केली आणि त्यानंतरच्या दिवशीच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
दत्त हे दूरध्वनी संभाषण तंत्रातील तज्ज्ञ होते. दत्त यांना जवळपास १०० तासांचे दूरध्वनी संभाषण संग्रही केले होते आणि हाच या प्रकरणाचा मुख्य पुरावा आहे, असे सूत्रांनी सांगितले.
९ मेला पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्या वेळी कोणत्याही खेळाडूचे किंवा सट्टेबाजाचे नाव त्यामध्ये नव्हते. ‘सामना निश्चिती करणारे मध्यस्थी, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीतील सट्टेबाज आणि काही खेळाडू सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये स्पॉट आणि मॅच फिक्स करत आहेत’, असे या अहवालात म्हटले गेले होते.
या तक्रारीमध्ये पुढे म्हटले गेले होते की, एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात अंडरवर्ल्डमधील काही व्यक्ती फिक्सिंगसाठी काम करत आहेत. या तक्रारीमध्ये असाही खुलासा करण्यात आला आहे की, काही खेळाडूंना सामन्यातील काही षटके निश्चित करण्यासाठी फार मोठी रक्कम देण्यात येत आहे. सामन्यातील कोणता भाग निश्चित करायचा, याची चर्चा सामन्यापूर्वीच सट्टेबाज आणि खेळाडूंमध्ये व्हायची. त्यानुसार मैदानातून हे खेळाडू सट्टेबाजांना इशारा कारायचे आणि सट्टेबाज त्या षटकावर पैसे लावायचे.

Story img Loader