दिल्ली, लखनौची वारी करीत आता इंडियन बॅडमिंटन लीग(आयबीएल)ची सवारी मुंबईच्या वातावरणातही रंग भरू लागली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ली चोंग वेईचा मुंबई मास्टर्स संघ एनएससीआयच्या घरच्या मैदानावर मंगळवारी दिल्लीचा सामना करणार आहे. मुंबई मास्टर्सने सलामीच्या लढतीत बांगा बिट्सवर मात केली होती, मात्र दुसऱ्या लढतीत ‘सख्खे शेजारी’ पुण्याने रोमहर्षक लढतीत त्यांना नमवले होते. क्रिश दिल्ली स्मॅशर्सला सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु दुसऱ्या लढतीत मुंबईकर प्राजक्ता सावंतच्या शानदार खेळाच्या जोरावर त्यांनी विजय साकारला होता. या पाश्र्वभूमीवर कामगिरीत सातत्य ठेवून विजयी परंपरा कायम राखण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
ली चोंग वेई मुंबईचा आधारस्तंभ आहे. एकेरी प्रकारात व्लादिमीर इव्हानोव्हने मुंबईचे विजयी प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्याचा साथीदार मार्क झ्बाइब्लरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. झ्बाइलरच्या जागी ली चोंग वेई खेळण्याची शक्यता आहे. प्रणव जेरी चोप्रा आणि एन.सिक्की रेड्डी या युवा जोडीकडून मुंबईला दमदार खेळाची अपेक्षा आहे. तीनवेळा अखिल इंग्लंड विजेती टायने बूनसारखी मातब्बर खेळाडू मुंबईच्या ताफ्यात आहे. मात्र दोन लढतीत तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभव बाजूला सारत नव्याने सुरुवात करण्यासाठी बून आतूर आहे. मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा व्लादिमीर दिल्लीविरुद्ध महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात संघाला विजय मिळवून देत व्लादिमीरने आपली उपयुक्तता सिद्ध केली होती.
दुसरीकडे दिल्लीसाठी एकेरीची बाजू थोडी कमकुवत आहे. मात्र दुहेरीत ज्वाला गट्टा, व्ही.दिजू आणि प्राजक्ता सावंत या त्रिकुटावर दिल्लीची मोठी भिस्त आहे. अरुंधती पानतावणेऐवजी अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. ज्वाला गट्टा खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात सहभागी होऊ शकली नव्हती. मात्र तिच्या अनुपस्थितीत प्राजक्ता सावंतने दिजूच्या साथीने तुफानी खेळ करत थरारक लढतीत दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला होता. डॅरेन लियू अनुभवी खेळाडू दिल्लीसाठी महत्त्वाचा आहे. एकेरीच्या दुसऱ्या लढतीसाठी दिल्ली संघ फेररचना करू शकतो. याचप्रमाणे साईप्रणीथ आणि एच.एस.प्रणॉय यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
* सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ईएसपीएन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा