नावाजलेले खेळाडूच जर निष्प्रभ ठरले तर कोणीही संघाला वाचवू शकत नाही, याचाच प्रत्यय दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राबाबत पाहावयास मिळाला. दिल्ली संघाने महाराष्ट्राला नऊ विकेट्स राखून पराभूत केले आणि अवघ्या दोन दिवसांत निर्णायक विजय मिळविला.
दिल्लीने ४ बाद १५७ धावांवरून रविवारी पहिला डाव पुढे सुरू केला. उर्वरित सहा फलंदाजांच्या मोबदल्यात त्यांनी आणखी ७३ धावांची भर घातली. ध्रुव शौरीचे नाबाद शतक हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. पहिल्या डावात त्यांना १५० धावांची आघाडी मिळाली. महाराष्ट्राकडून समाद फल्लाने पाच फलंदाज बाद केले.
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. फरक एवढाच की, त्यांनी या डावात पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडला. ५६ षटकांत अवघ्या १७६ धावांत त्यांचा डाव गुंडाळला गेला. दिल्लीने विजयासाठी मिळालेले २७ धावांचे आव्हान एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले व निर्णायक विजयाचे सहा गुण मिळविले.
एका बाजूने विकेट्स पडत असताना शौरीने शतक पूर्ण केले. त्याने नऊ चौकार व चार षटकार अशी आतषबाजी करीत नाबाद १०४ धावा केल्या. महाराष्ट्राकडून फल्ला याने पाच, तर मुंडे याने चार बळी घेतले.
दिल्ली संघाच्या मनन शर्मा व पवन नेगी यांनी प्रभावी फिरकी मारा करीत महाराष्ट्राच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडविली. संग्राम अतितकरने सर्वाधिक ३० धावा केल्या, तर कर्णधार रोहित मोटवानीने नाबाद २७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र सर्व बाद ८० व १७६ (हर्षद खडीवाले २६, संग्राम अतितकर ३०; मनन शर्मा ४/४७, पवन नेगी २/१२). दिल्ली ६८.१ षटकांत २३० (ध्रुव शौरी नाबाद १०४, नितीश राणा ५९; समाद फल्ला ५/४५, श्रीकांत मुंडे ४/१००) व १४ षटकांत १ बाद ३०.