ओडेन्स : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची डेन्मार्क खुल्या स्पर्धेतील (सुपर ७५० दर्जा) घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या जॉर्जिया टुनजुंगने सिंधूचा प्रतिकार २१-१३, १६-२१, २१-९ असा मोडीत काढला.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱ्या इंडोनेशियाच्या टुनजुंगला यापूर्वी सिंधूविरुद्ध झालेल्या १२ लढतींत केवळ दोनच विजय मिळवता आले होते. या वेळी तिने तिसऱ्या विजयाची भर घातली. सिंधूने दुसरा गेम जिंकून रंगत आणली असली, तरी पूर्ण लढतीत टुनजुंगने वर्चस्व दिसून आले. उपांत्य फेरीत आता टुनजुंगची कोरियाच्या अव्वल मानांकित अॅन से यंगशी गाठ पडेल.
हेही वाचा >>>WI vs NZ : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाची लढत
सिंधूविरुद्ध टुनजुंगने कमालीच्या वर्चस्वाने खेळ केला. सलग आठ गुणांची कमाई करून तिने पहिला गेम अगदी सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने कामगिरी उंचावली. आक्रमक खेळ करत तिने ६-१ अशी आघाडी घेतली होती, पण हे वर्चस्व ती राखू शकली नाही. टुनजुंगने आधी ६-६ अशी बरोबरी केली आणि नंतर ९-७ अशी आघाडी मिळवली. मात्र, सिंधूने आपला प्रतिकार कायम ठेवताना गेमच्या मध्याला ११-१० अशी निसटती आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने मागे वळून पाहिले नाही. दुसरा गेम जिंकत सिंधूने लढत निर्णायक गेममध्ये नेली. या निर्णायक गेममध्ये सिंधूला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. तिने हा गेम १२ गुणांनी गमावला.