ओडेन्स : भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि आकर्षी काश्यप यांनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.सिंधूने पहिल्या फेरीचा अडथळा पार केला असला, तरी तिला विजयासाठी तीन गेम आणि ५६ मिनिटे झुंजावे लागले. सिंधूने स्कॉटलंडच्या किस्र्टी गिलमोरचा २१-१४, १८-२१, २१-१० असा पराभव केला. आकर्षी कश्यपलाही तीन गेम लढत द्यावी लागली. आकर्षीने जर्मनीच्या ली वोन्नेचे आव्हान १०-२१, २२-२०, २१-१२ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचे आव्हान असेल. सिंधूने ग्रेगोरियाविरुद्ध आठ लढती जिंकल्या असल्या तरी अखेरच्या तीनपैकी दोन लढतीत ग्रेगोरियाने सिंधूला पराभूत केले आहे. त्याच वेळी आकर्षी थायलंडच्या सुपानिदा केटथाँगशी खेळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरुष एकेरीत श्रीकांतला मात्र, लय मिळवण्यात अपयश आले. त्याचा कडवा प्रतिकार कमी पडला. चीनच्या वेंग हाँग यांगने श्रीकांतवर १९-२१, २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला. लक्ष्य सेनलाही पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. लक्ष्यला थायलंडच्या केन्टाफॉन वँगचारोएनकडून १६-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, एम.आर. अर्जुन-ध्रुव कपिला, तर महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री वर्तक यांनी माघार घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark open badminton tournament pv sindhu and akarshi kashyap enter women singles second round amy