मालदीवविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आत्मविश्वास उंचावणारा विजय मिळविणाऱ्या गतविजेत्या भारताला सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेवरील आपले वर्चस्व टिकवण्यासाठी बुधवारी बलाढय़ अफगाणिस्तानशी भिडावे लागणार आहे.
‘फिफा’ क्रमवारीत अफगाणिस्तानचा क्रमांक १३९वा तर भारताचा १४५ आहे. त्यामुळे कागदावर तरी अफगाणी संघ अधिक ताकदवान आहे. त्यांचे बहुतांशी खेळाडू अमेरिका आणि जर्मनमध्ये खेळत असल्याचा फायदाही त्यांना मिळेल.
मेडिओ मुस्तफ आझादझॉय आणि बचावपटू मुस्तफा हदिद जर्मन लीगमध्ये खेळतात, तर आघाडीपटू मोहम्मद युसूफ अमेरिकेतील स्पध्रेत खेळतो. आतापर्यंतच्या नऊ सॅफ फुटबॉल अजिंक्यपदांपैकी सहा वेळा भारताने विजेतेपदावर नाव कोरले आहे, तर उपांत्य फेरी गाठण्यात फक्त एकदा अपयश आले आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या मागील सॅफ अजिंक्यपद स्पध्रेत भारताने अफगाणिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवला होता.
‘‘मागील स्पध्रेत पंचांमुळे (सिंगापूरचे सुखबिर सिंग) आमची कामगिरी उंचावू शकली नव्हती. त्यामुळे या वेळी पराभवाची परतफेड करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तांत्रिक आणि शारीरिकदृष्टय़ा आमचा संघ भारतीय संघापेक्षा अधिक मजबूत आहे,’’ असे अफगाणिस्तानचे साहाय्यक प्रशिक्षक अली जवाद अट्टाइ यांनी सांगितले. अफगाणिस्तानचा संघनायक फक्रुद्दीन अमिरी आय-लीगमध्ये मुंबई फुटबॉल क्लबकडून खेळतो.
उपांत्य फेरीच्या सामन्यात मालदीवविरुद्ध भारताने अतिशय चांगली व्यूहरचना आखली होती. गौरमंगी सिंगचा नेत्रदीपक बचाव आणि युवा अर्नब मोंडलचा आत्मविश्वासपूर्ण खेळ भारताच्या पथ्यावर पडला. भारताचा कर्णधार सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्या भारतीय फुटबॉलपटूच्या विक्रमाच्या नजीक आहे. हॉलंडचे प्रशिक्षक ४-४-२पेक्षा ४-५-१ या व्यूहरचनेवर भर देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा