देविंदर वाल्मिकीची भारतीय संघात निवड; युवराजचे स्वप्न भावाकडून साकार

सातत्यपूर्ण कामगिरी करून लक्ष वेधून घेणारा मुंबईकर हॉकीपटू देविंदर वाल्मिकी याची रिओ ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या भारतीय हॉकी संघात मंगळवारी निवड जाहीर झाली. देविंदरच्या रूपाने तब्बल बारा वर्षांनंतर मुंबईकर खेळाडू ऑलिम्पिकच्या क्रीडांगणावर पाय रोवणार असल्याने मुंबईतील क्रीडारसिकांच्या आनंदालाही उधाण आले आहे.

देविंदरला हॉकीची प्रेरणा त्याचा भाऊ आणि नामवंत हॉकीपटू युवराज वाल्मिकी याच्याकडूनच मिळाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वाल्मिकी कुटुंबातील युवराजने प्रथम हॉकीचे मैदान गाजवले आणि त्यानंतर वाल्मिकी कुटुंबियांनाच हॉकीने जणू वेड लावले. या निवडीनंतर मारलेल्या गप्पांत देविंदरही भावाविषयी भरभरून बोलला. तो म्हणाला, स्वप्नपूर्तीचा आनंद कुणाला होणार नाही. हे स्वप्न खरेतर युवराजचे होते. त्याला पाहूनच या खेळाकडे मी वळलो आणि आज ऑलिम्पिक संघात निवड झाल्यामुळे भावाचे स्वप्न मी पूर्ण केल्याचे समाधान मला मिळाले आहे. घरच्यांनाही खूप आनंद झाला आहे.

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूप्रमाणे मीही पाहिले आणि आज ते पूर्ण होत आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघात निवड होणे, हे मला पडलेले गोड स्वप्नच आहे. याचे श्रेय मी युवराजलाच देतो. त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हते. त्याला माझ्यातर्फे ही सर्वोत्तम भेट आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.  युवराजने २०१०साली भारताकडून पदार्पण केले होते.

३७ ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारा देविंदर हा ३७वा खेळाडू आहे. २००४मध्ये अ‍ॅड्रियन डिसूजा यांनी शेवटचे भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

०४मुंबईचे खेळाडू धनराज पिल्ले यांनी सर्वाधिक ४ (१९९२, १९९६, २००० आणि २००४) वेळा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर एम. एम. सोमया (१९८०, १९८४, १९८८) आणि मर्विन फर्नाडिस १९८०, १९८४, १९८८) यांचा क्रमांक येतो.

देविंदरचे सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो. त्याने माझे स्वप्न पूर्ण केले. आता त्याने देशाला पदक पटकावून द्यावे ही इच्छा आहे. त्याला आणि भारतीय संघाला शुभेच्छा.

– युवराज वाल्मिकी

भाऊ युवराजला पाहूनच मी हॉकी स्टीक हातात घेतली. तो माझा पहिला आदर्श आहे, बाकी सगळे नंतर. तो माझा गुरू आहे आणि ऑलिम्पिक पदकाची गुरुदक्षिणा मला त्याला द्यायची आहे.

– देविंदर वाल्मिकी

Story img Loader