भारताचा राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता खेळाडू एल. देवेंद्रसिंग, विकास कृष्णन आणि शिवा थापा यांनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवीत जागतिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. तसेच त्याचे या स्पर्धेतील किमान कांस्यपदकही निश्चित झाले आहे.
देवेंद्रने (४९ किलो) इंडोनेशियाच्या कॉर्नेलिस क्वांगु लांगु याच्यावर ३-० अशी मात केली. त्याला उपान्त्य फेरीत अग्रमानांकित हसनबॉय दुस्मातोव याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. येथील उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे त्याला जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली आहे. जागतिक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार असून त्याला ऑलिम्पिक पात्रता फेरीचा दर्जा लाभला आहे.
शिवा थापाने (५६ किलो) किर्गीझस्तानच्या आमुर्बेक मालाबेकोव्हवर २-१ असा विजय मिळवला. विकासने (७५ किलो) माजी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या व्हिएतनामच्या डिन्ह होअँग ट्रओंगचा ३-० असा धुव्वा उडवला. मनोज कुमारला (६४ किलो) मात्र उझबेक फझलिद्दिन गैबनाझारोव्हकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला.
देवेंद्रने कॉर्नेलिसविरुद्धच्या लढतीत प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. त्याने दोन्ही हातांच्या ठोशांचा कल्पकतेने उपयोग केला व सहज विजय मिळविला. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्षसिंग यांनी देवेंद्रच्या खेळाचे कौतुक करीत सांगितले की, ‘‘त्याने सुरेख खेळ केला. त्याच्यापुढे दुस्मातोव याचे आव्हान असले तरी जिद्दीच्या जोरावर तो दुस्मातोव याच्यावर विजय मिळवू शकेल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा