मायकेल क्लार्कची अखेरची कसोटी असलेल्या अ‍ॅशेसच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत २ बाद १८४ अशी मजल मारली.
इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने ढगाळ वातावरण लक्षात घेत, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेंडू स्विंग होणाऱ्या वातावरणात डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस रॉजर्स यांनी ११० धावांची सलामी दिली. शेवटची कसोटी खेळणाऱ्या रॉजर्सला मार्क वूडने कुककडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने ४३ धावा केल्या. रॉजर्स बाद झाल्यानंतर वॉर्नरला स्टीव्हन स्मिथची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. शतकाकडे कूच करणाऱ्या वॉर्नरला मोइन अलीने बाद केले. वॉर्नरने ११ चौकारांसह ८५ धावांची खेळी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या मायकेल क्लार्कला इंग्लंडच्या खेळाडूंना ‘गार्ड ऑफ ऑनर’ अर्थात मानवंदना दिली. उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २ बाद १८४ झाल्या आहेत. क्लार्क १४ तर स्मिथ २९ धावांवर खेळत आहेत.

Story img Loader