ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे :  पुण्याच्या देविका घोरपडेने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेतील पदार्पणात सुवर्णपदक पटकावले. या सोनेरी कामगिरीनंतर तिने आता ऑलिम्पिक पदकाचा ध्यास घेतला आहे. मी आणखी एक वर्ष युवा गटात खेळू शकते. त्यानंतर वरिष्ठ गटात खेळण्याची संधी मिळेल. कठोर मेहनत करून भविष्यात ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे उद्दिष्ट मी डोळय़ासमोर ठेवले आहे, असे देविकाने सांगितले.

स्पेनमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत अमेरिकेच्या लॉरेन मॅकीवर एकतर्फी वर्चस्व राखून देविकाने ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या सोनेरी यशानंतर तिने ऑलिम्पिक पदकाचे ध्येय बाळगले आहे. पुण्यात माऊंट कॅरेमल प्रशालेतून शालेय शिक्षण घेतल्यावर १७ वर्षीय देविका सध्या बीएमसीसी महाविद्यालयात शिकत आहे. ‘‘युवा गटात अजून एक वर्ष मला खेळता येईल. त्यानंतर २०२४ हे ऑलिम्पिकचे वर्ष आहे. त्या वर्षांपासून मला वरिष्ठ गटातून खेळण्याची संधी मिळेल. मात्र, मी थेट ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. पण, २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून कठोर मेहनत घेईन,’’ असे देविकाने सांगितले.

जागतिक युवा स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व राखल्यानंतरही देविका स्वत:च्या खेळाबाबत पूर्णपणे समाधानी नाही. ‘‘या स्पर्धेत पहिल्या चार लढतींत मला अपेक्षित खेळ करता आला नाही. माझ्याकडून सुरुवातीपासून आक्रमक खेळ झाला. अखेरच्या फेरीत त्यामुळे काहीशी दमछाक झाली होती. पण, चांगल्या सुरुवातीचा मला फायदा झाला. मी अधिक दर्जेदार खेळ करू शकले असते,’’ असे देविका म्हणाली. 

देविका आदर्श शिष्या आहे. सराव करताना ती कमालीची एकाग्र असते. त्याचा देविकाला फायदा होतो. आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकाने देविकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. आता जागतिक स्पर्धेत मिळविलेल्या सुवर्ण यशाने देविकाचा आत्मविश्वास उंचावेल आणि भविष्यात ती अधिक यशस्वी खेळाडू म्हणून नावारूपाला येईल.

– मनोज पिंगळे, माजी ऑलिम्पिकपटू आणि देविकाचे प्रशिक्षक