महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील विजेतेपदाचा दावेदार होता. मात्र बलाढय़ भारतीय संघावर सनसनाटी विजय मिळवीत बांगलादेशने अजिंक्यपद मिळविले. त्यांच्या या विजयात संघाच्या सहायक प्रशिक्षक देविका पळशीकर या मराठमोळय़ा क्रिकेटपटूचा महत्त्वाचा वाटा आहे.
क्वालालंपूर येथे रविवारी झालेल्या अंतिम लढतीत बांगलादेशने ही किमयागारी केली. या संघासाठी प्रशिक्षक म्हणून अंजू जैन व देविका या दोन्ही भारतीय प्रशिक्षकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. जेमतेम काही दिवसांच्या सरावाच्या जोरावर बांगलादेशच्या खेळाडूंनी आश्चर्यजनक कामगिरी केली. या बाबत क्वालालंपूर येथून पळशीकर यांनी सांगितले, खेळाडूंप्रमाणेच आमच्यासाठीही हे अजिंक्यपद ही खरोखरीच आश्चर्याचा धक्का देणारी कामगिरी आहे. खरंतर आमच्या देशाविरुद्ध आम्ही लढणे हे आम्हाला रुचत नव्हते, मात्र व्यवसायाचा एक भाग म्हणूनच आम्ही या लढतीकडे पाहिले. बांगलादेशच्या संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश होता, त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते.
अंतिम फेरीबाबत कोणती व्यूहरचना केली होती असे विचारले असता पळशीकर यांनी सांगितले, ‘‘अगोदरच्या सामन्यांमध्ये आमच्या द्रुतगती गोलंदाजांनी अपेक्षेइतका प्रभाव दाखविला नव्हता. हे लक्षात घेऊन मी भारताविरुद्ध फिरकी गोलंदाजीवर भर देण्याचे ठरविले. सुदैवाने माझ्या नियोजनाप्रमाणेच घडत गेले. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी आमची चर्चा झाली. त्या वेळी आपण अजिंक्यपद मिळवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करण्यावर मी भर दिला. त्याचप्रमाणे फलंदाजीच्या क्रमवारीत काही बदल केले. अंजू हिने स्पर्धेपूर्वी जेमतेम दहा-बारा दिवस अगोदर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. मी या संघाबरोबर एप्रिल महिन्यापासून काम करीत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर झालेल्या मालिकेच्या वेळी प्रशिक्षक म्हणून मी बारकाईने या खेळाडूंचा अभ्यास केला आहे. त्याचाही फायदा मला या स्पर्धेच्या वेळी झाला. बांगलादेश संघास आशिया चषक जिंकून देण्यात आम्हा दोन्ही भारतीय महिला खेळाडूंचाच मोठा वाटा आहे.’’
अंजू यांचाही विजयात मोलाचा वाटा
बांगलादेश महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाताळून अवघे तीन आठवडे झालेले असतानाच अंजू जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगलादेश संघाला यशाच्या शिखरावर नेले. आशिया चषकातील अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला नमवून प्रथमच आशियाई विजेते होण्याचा मान मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे बांगलादेश बोर्डने डेव्हिड चॅपेल यांना प्रशिक्षकपदावरून काढून अंजू यांची निवड केली. ‘‘मी २०१२च्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान भारताला प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले होते. त्यामुळेच भारतीय खेळाडूंचा खेळ मला ठावूक होता व त्याचा पुरेपूर फायदा येथे झाला,’’ असे अंजू म्हणाल्या.