पी.टी. उषा हे भारतीय अॅथलेटिक्स इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्व.. ऑलिम्पिक पदकासाठी तिने जीवाचे रान केले.. एक शतांश सेकंदाने तिच्या पदरी निराशा आली.. स्वत:ला ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण करता आले नसले तरी तिने आता संपूर्ण आयुष्य अॅथलेटिक्सला समर्पित केले आहे.. देशाला अॅथलेटिक्समधलं पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यासाठी तिची धडपड सुरू आहे.
ऑलिम्पिक पदक हे क्रीडा क्षेत्रातील एव्हरेस्ट. भारतासारख्या देशात अॅथलीट्सची खाण असली तरी त्यांच्यासाठी अद्ययावत सुविधांची बोंब असतानाही त्यांच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगली जाते. ऑलिम्पिक पदक हे एक-दोन वर्षांत मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी खडतर तपश्चर्या करणे गरजेचे आहे. ऑलिम्पिक पदक हाच खेळाडूंचा ध्यास असायला हवा. आधुनिक सोयीसुविधा, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, पुरस्कर्त्यांचे पाठबळ खेळाडूंना लाभले तर भारतीय अॅथलीट्सही ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकावतील, असा विश्वास महान धावपटू पी. टी. उषा यांनी व्यक्त केला. यशस्वी कारकीर्दीनंतरची त्यांची वाटचाल आणि भारतीय अॅथलेटिक्समधील सद्यस्थितीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत-
भारतात एक यशस्वी अॅथलीट बनणे किती कठीण आहे?
तळागाळात आपल्याकडे अफाट गुणवत्ता आहे, पण एक यशस्वी अॅथलीट बनणे, हे फारच कठीण आहे. अॅथलीट्सने स्वत:चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खडतर वाटचाल करायला हवी. खेळाडूंना प्रत्येक पावलागणिक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी अडथळ्यांची शर्यत पार करण्याची तयारी खेळाडूंची असायला हवी. ऑलिम्पिक पदक मिळवल्यानंतरच पुरस्कर्ते आपल्याकडे धावून येतात, ही भारतातील परिस्थिती आहे. टिंटू लुकाने लंडन ऑलिम्पिकमध्ये ११व्या स्थानी मजल मारली, तरी ती अद्याप पुरस्कर्त्यांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी प्रत्येक अॅथलीटला तारेवरची कसरत करावी लागते.
भारतात अॅथलेटिक्समध्ये समृद्ध परंपरा आहे, पण १९९०च्या दशकानंतर आपण चांगले अॅथलीट का घडवू शकलो नाही?
मधल्या काळात अनेक चांगले अॅथलीट येऊन गेले, पण त्यांची कारकीर्द एक-दोन वर्षांपुरती मर्यादित राहिली. मी स्वत: दोन दशके सातत्याने कामगिरी केली, त्यामुळे मी इतकी नावारूपाला येऊ शकले. मिल्खा सिंग यांची कारकीर्दही समृद्ध आहे. त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात आपले स्थान कायम राखले आहे.
भारतीय अॅथलीट्सना चांगल्या सुविधा मिळत आहेत, परदेशी प्रशिक्षक त्यांच्या दिमतीला आहे, राष्ट्रकुल किंवा आशियाई स्पर्धामध्ये आपण पदकांची लयलूट करतो, पण ऑलिम्पिकमध्ये आपण इतके का मागे पडत आहोत?
ऑलिम्पिक पदक हे एक-दोन वर्षांत मिळणार नाही. त्यासाठी खडतर तपश्चर्या करायला हवी. त्यासाठी भविष्यकालीन योजना आणि प्रत्येक राज्यात एक अद्ययावत अकादमी असायला हवी. खेळाडूंना पोषक आहार, आधुनिक प्रशिक्षण, चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात. भारतातल्या कोणत्याही धावपटूला सध्या झटपट यश मिळणार नाही. २००२ मध्ये मी अकादमी सुरू केली, तेव्हा १० वर्षांनंतर माझ्या अकादमीतील पहिली मुलगी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकली. लहानपणापासूनच टिंटू लुकावर आम्ही मेहनत घेतली. कोणतेही पाठबळ नसतानाही १६व्या वर्षी ती ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकली. योग्य वयात खेळाडूंना पुरस्कर्ते लाभले तर भारताला ऑलिम्पिकमध्येही पदकाची अपेक्षा बाळगता येईल.
अॅथलेटिक्समध्येही उत्तेजकांनी शिरकाव केला आहे, त्याबद्दल काय सांगाल?
कोणत्याही खेळात उत्तेजकांचा समावेश हा हानीकारकच असतो. उत्तेजके घेऊन जास्तीत जास्त एक-दोन वर्षे चांगली कामगिरी करू शकतो. उत्तेजकांचा सहारा घेऊन पैसा आणि प्रसिद्धी कमावता येऊ शकते, पण पितळ उघडे पडल्यानंतर आपल्याला तोंड लपवायलाही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तळागाळातील युवा खेळाडूंमध्ये उत्तेजकांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न हुकल्यानंतर आता कोणते ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे?
ऑलिम्पिक पदक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकआधी मी दोनच स्पर्धामध्ये सहभागी झाले होते. त्या वेळी मला चांगले प्रतिस्पर्धी लाभले नव्हते. फारसा अनुभव नसतानाही ऑलिम्पिकमध्ये माझी कामगिरी चांगली झाली. त्या वेळी योग्य मार्गदर्शन लाभले असते तर मी नक्कीच ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातली असती. आता माझ्या अकादमीतील खेळाडूने देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून द्यावे, हेच माझे स्वप्न आहे.
उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सची वाटचाल कशी सुरू आहे?
ऑलिम्पिक पदक हेच माझे एकमेव उद्दिष्ट होते, पण एक दशांश सेकंदाने मला ऑलिम्पिक कांस्यपदकाने हुलकावणी दिली. त्यामुळे देशाला अॅथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यासाठी मी माझे जीवन अॅथलेटिक्सला समर्पित केले आहे. २००२ मध्ये ‘उषा’ अकादमीची (उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स) स्थापना केली. केरळ सरकारने माझ्या अकादमीसाठी ३० एकर जागा दिली. १० वर्षांनंतर माझी शिष्या टिंटू लुका लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली. अकादमीतील खेळाडूंची प्रगती पाहून तत्कालीन क्रीडामंत्री अजय माकेन यांनी सिंथेटिक ट्रॅक मंजूर केला होता. सध्या ट्रॅक बसवण्याचे काम सुरू आहे. टिंटू लुकासह जेसी जोसेफ यांच्याकडून मला भविष्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.