एबी डिव्हिलियर्स हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मिस्टर ३६० डिग्री अशी ओळख असलेल्या डिव्हिलियर्सच्या निवृत्तीला वर्षही पूर्ण झाले नसताना, क्रिकेटला डेवाल्ड ब्रेविसच्या रूपात आणखी एक एबी डिव्हिलियर्स मिळाला. ‘बेबी एबी’ म्हणून डेवाल्ड ब्रेविसने सध्या सुरू असलेला अंडर १९ वर्ल्डकप गाजवला. इतकेच नव्हे, तर ब्रेविसने भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा अंडर-१९ विश्वचषकातील मोठा विक्रम मोडला आहे.
अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सातव्या स्थानासाठीचा दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये ब्रेविसने १३८ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. यासह ब्रेविसने अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक धावांचा शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. ब्रेविसने सध्या सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकात एकूण ५०६ धावा केल्या होत्या. त्याने शिखर धवनचा ५०५ धावांचा विक्रम मोडला. धवनने २००४ मध्ये हा पराक्रम केला होता.
हेही वाचा – अॅशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंडनं घेतला मोठा निर्णय; प्रमुख व्यक्तीची केली हकालपट्टी!
यावर्षी डेवाल्ड ब्रेविसने प्रोटीज संघासाठी फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने ८४.३३च्या सरासरीने धावा केल्या आहेत ज्यात तीन अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. धावा काढण्याबरोबरच, ब्रेविसच्या खेळण्याच्या शैलीमुळे त्याला ‘बेबी एबी’ नावाची ओळख मिळाली.
डेवाल्ड ब्रेविस हा स्वतः एबी डिव्हिलियर्सचा मोठा चाहता आहे. दोघेही एकाच शाळेसाठी क्रिकेट खेळले आहेत. एबी डिव्हिलियर्सप्रमाणे, डेवाल्ड ब्रेविस देखील १७ क्रमांकाची जर्सी घालतो. तो आयपीएल २०२२ लिलावासाठी निवडलेल्या ५९० खेळाडूंपैकी एक आहे.