लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या सुमार कामगिरीने माजी कर्णधार धनराज पिल्ले व्यथित झाला आहे. भारतीय संघ तसेच हॉकीच्या भवितव्याविषयी बोलण्यातही त्याला स्वारस्य उरलेले नाही. संघाच्या चांगल्या प्रदर्शनासाठी विदेशी प्रशिक्षकाची गरज काय, असा परखड सवाल त्याने केला.
 ऑलिम्पिकच्या दुस्वप्नानंतर ऑस्ट्रेलियात सुपर सीरिजमध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र यासाठी विदेशी प्रशिक्षकाची आवश्यकता नाही, असे मत धनराजने व्यक्त केले.
‘‘विदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकीचा विकास होऊ शकत नाही. प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या संस्कृतीमध्ये जमीन-अस्मानचे अंतर आहे. लंडनमध्ये सुमार कामगिरीनंतरही विदेशी प्रशिक्षकाच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आले. खेळाडूंची मनोभूमिका समजून घेणाऱ्या भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती व्हायला हवी,’’ असे धनराजने सांगितले.
‘‘लंडन ऑलिम्पिकमध्ये १२ संघांमध्ये भारताला बारावे अर्थात शेवटचे स्थान मिळाले. यापेक्षा वाईट निकाल असू शकत नाही, ऑलिम्पिकपर्यंत आम्ही गप्प बसलो. पण त्यानंतर काय? मात्र या खराब कामगिरीविषयी कोणीही काही बोलत नाहीये आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची आपण स्वप्न बघत आहोत.
लंडनमध्ये काय चुकले याची मीमांसा करायला हवी, त्यानंतर रिओसाठी योजना आखायला हव्यात,’’ असे धनराज तळमळीने सांगतो.

Story img Loader